औरंगाबाद- सिमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांनीदेखील गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. छावणी भागातील भारतीय सैन्याच्या तुकडीने शहरातील बेघर निवारागृहात प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना अन्न पुरविण्याचे काम सुरू केले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कठीण प्रसंगी भारतीय लष्करातील सैनिकांनी शहरातील जीवन जागृती आरोग्य आणि सामाजिक संस्था, बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि संत गाडगे महाराज सांस्कृतिक आणि क्रीडा शिक्षण मंडळाच्या मदतीने शहरातील निवारागृह, विविध झोपडपट्टी परिसर, घाटी दवाखाना परिसर येथे असलेल्या निराधार कुटुंबाना अन्नाची पाकिटे दिली आहेत. असे करून सैन्याने आपले सामाजिक कर्तव्य जपून इतरांसाठी एक आदर्श ठेवला आहे. लॉकडाऊन उठेपर्यंत गरजू व्यक्तींना नियमित अन्न पुरवठा केला जाईल, असे आश्वासन सैन्यातर्फे देण्यात आले आहे.
हेही वाचा- कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या महिलांचे हाल, अद्याप रेशन दुकानात मिळत नाही धान्य