औरंगाबाद - युतीचे बंड आता थंड झाले असून मराठवाड्यात सेना-भाजपत कुठलेही वाद शिल्लक राहिले नाहीत. सर्वच कार्यकर्ते एकदिलाने कामाला लागले आहेत. उलट काँग्रेसमध्ये वाद उठत असल्याची टीका अर्जुन खोतकर यांनी केली. ते खासदार चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी औरंगाबादला आले होते.
मराठवाड्यातील निवडणुकीत समन्वयकाची भूमिका शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे सांभाळत आहेत. मराठवाड्याची जबाबदारी असताना परभणीत मेघना बोर्डीकर या नाराज होत्या. त्यांच्याकडे जाऊन त्यांची समजूत काढली. हिंगोलीत अॅड. शिवाजीराव यांनी उमेदवारी अर्ज भरला होता, त्यांना मुख्यमंत्र्यांचा संदेश देत अर्ज मागे घ्यायला लावला. अशीच परिस्थिती उस्मानाबादला होती. मात्र, सर्व नाराज सहकाऱ्यांची समजूत काढण्यास यश आले असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
इतकेच नाही तर मराठवाड्यात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलेच वादविवाद राहिले नसून एकदिलाने प्रचार सुरू झाल्याचे खोतकर यांनी सांगितले. विरोधकांमध्ये अंतर्गत वाद आहेत. अब्दुल सत्तार आमचे चांगले मित्र आहेत. मात्र, मागील ३५ वर्षांत पहिल्यांदा काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. लोकसभेची निवडणूक लढवायला त्यांना उमेदवार देखील मिळत नसल्याची टीका अर्जुन खोतकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.