औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर निवडणूक लढवण्याची आशा मावळली आहे. मात्र, खोतकर निवडणुकीत काँग्रेसचे काम करतील, असा गौप्यस्फोट काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. अर्जुन खोतकर आपला अपमान विसरणार नाहीत. त्यामुळे ते मराठवाड्याचे प्रचारप्रमुख असले तरी जालना मतदारसंघात ते काँग्रेसलाच मदत करतील, असे सत्तार यांनी सांगितले.
औरंगाबाद काँग्रसने निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार असेल आणि त्याला अर्जुन खोतकर मदत करतील, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. गेल्या ३ वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटून आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आधी सेना-भाजपने युतीची घोषणा केली. त्यामुळे खोतकर पक्षाच्या भूमिकेवर समाधानी नाहीत, हे समोर आल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असे अर्जुन खोतकर यांनी अनेक वेळा सांगितले आहे.
या सर्व घडामोडींनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या घरी जाऊन खोतकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी देखील झाले. मात्र, त्यानंतर जालना जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खोतकर यांनी लोकसभा लढवावी यासाठी खोतकर यांच्या बंगल्यावर तळ ठोकला.
मराठवाड्याचे प्रचार प्रमुख म्हणून अर्जुन खोतकर यांची वर्णी शिवसेनेकडून लावण्यात आली आहे. अर्जुन खोतकरांनी निवडणुकीतून माघार घेतली हे स्पष्ट झाले असले तरी अर्जुन खोतकर हे जालना जिल्ह्यात काँग्रेसचे काम करतील, असा गौप्यस्फोट काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. इतकेच नाही तर 'आगे आगे देखो होता है क्या' असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात अनेक गौप्यस्फोट करण्याचे सूतोवाच केले.