औरंगाबाद - शिवशक्ती भीमशक्ती हा बाळासाहेबांनी व्यक्त केलेला विचार आहे. कोणत्याही क्षणी शिवशक्ती, भीमशक्ती युतीच्या घोषणेची शक्यता आहे. यांच्याशी तशी चर्चा झालेली आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. या युतीत काँग्रेस, राष्ट्रवादीला देखील सहभागी करून घेतले जाणार असून उद्धव ठाकरे तसा प्रयत्न करत आहेत असे, अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
तैलचित्र अनावरणाचे निमंत्रण पण - उद्या विधिमंडळात होणाऱ्या शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रांच्या अनावरण होणार आहे. ते झालं पाहिजे, आम्हाला निमंत्रण मिळाले आहे. पण, या अनावरनाला जायचे की, नाही ते आम्ही ठरवू असंही दानवे यांनी म्हटले आहे. गद्दारांच्या हाताने अनावरण केले जाते आहे अशी टीका त्यांनी केली. दावसमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची फसवणूक केलेली आहे असा आरोप देखील त्यांनी केला. मुख्यमंत्री प्रत्यक्षात काहीच करत नाही. मात्र कोट्यावधींच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावर बोलताना महाविकास आघाडीतील नेते एकमेकांच्या पक्षांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो असंही अंबादास दानवे यांनी सांगितलं.
पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करा - शहरातील गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढुमे या अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला नुसतं निलंबन करून चालणार नाही. त्याला बडतर्फ करावे अशी मागणी आमच्या वतीने करण्यात आली आहे. नीलम गोरे यांनी देखील तसे पत्र दिले आहे. सरकार ही कारवाई करेल असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
अंबादास दानवेंना नोटीस - मातृभूमी प्रतिष्ठाणचं कार्यालय खाली करण्याबाबत भूविकास बँकेने नोटीस बजावली आहे असे ऐकण्यात आहे. मात्र, नोटीस कुठे आहे, अजून मला मिळाली नसून नोटीस मिळाल्यानंतर कायद्याच्या भाषेत उत्तर देण्यात देऊ. या प्रतिष्ठानमध्ये मी एकटा काम करत नसून आमची बॉडी काम करते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आम्ही मदत करत असतो, अशा नोटीस येतच असतात अशी, टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.