औरंगाबाद - अपार्टमेंटमध्ये राहिल्यास कुटुंब एकटे पडते, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय औरंगाबादेत समोर आला आहे. बन्सीलालनगर परिसरातील अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंटमधील एका ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झालेचे आठ दिवसाने समोर आले आहे. विजय माधव मेहंदळे (७०), त्यांच्या पत्नी माधुरी (६५) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या राहत्या घरातून दुर्गंधी आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आठ दिवसांपासून बंद होते घर-
अजिंक्य फिलोसिया अपार्टमेंटमधील ४०३ क्रमांकाच्या फ्लॅटचा दरवाजा गेल्या आठ दिवसांपासून बंद होता. घरात आजी-आजोबा एकटे राहतात याबाबत माहिती असूनही परिचितांनी किंवा बाजूला असणाऱ्या शेजाऱ्यांनी साधी विचारपूस करण्याची तसदी घेतली नाही. मात्र मंगळवारी दुपारच्या सुमारास दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा तेथे राहणारे विजय माधव मेहंदळे, त्यांच्या पत्नी माधुरी यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
मृतदेह होते कुजलेल्या अवस्थेत-
घरातून वास येत असल्याने अपार्टमेंटमधल्या रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, उपनिरीक्षक देवकते आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मेहंदळे यांच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. पथकातील एका कर्मचाऱ्याने छतावर जाऊन गॅलरीत उतरून आत पाहिले असता मेहंदळे दांपत्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी दरवाजा तोडून पंचनामा करत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंत्यसंस्कार करावे लागले पोलिसांना-
मिळालेल्या माहितीनुसार विजय मेहंदळे यांना सोरायसिसचा आजार जडला होता. त्यांच्या पत्नी माधुरी यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने वर्षभरापासून अंथरुणाला खिळून होत्या. विजय हे पत्नीची शुश्रूषा करून घरातली सर्व कामे करायचे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून ते घराबाहेर पडले नाहीत. घरात दोघांशिवाय कोणीही नसल्याने दोघांच्या मृत्यूची बाब उघडकीस आली नाही. त्यांचे साडू शहरात राहतात. मात्र, ते वयोवृद्ध आहेत. तर मेहदळे यांना एक मुलगी असून तोदेखील अमेरिकेत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या एकुलत्या मुलीने परिस्थितीमुळे येण्यास असमर्थता दर्शवल्याने अखेर वेदांतनगर पोलिसांनी या दांपत्यावर अंत्यसंस्कार केले.