औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून ती परिस्थिती गंभीर झाली आहे. यामुळे आमचा फोन वाजला की मनात धडकी भरते. कधी कधी फोन उचलूच नये असे वाटते. कारण गेल्या काही दिवसांचा अनुभव पाहून फोन उचलताना अनेक प्रश्न मनात गोंधळ घालतात. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती गेलेली असते. पण, आमची जबाबदारी समजून आम्ही जीवावर उदार होऊन काम करत आहोत. आता हे सगळे थाबांवे व पूर्वीचे दिवस परत यावे, अशी प्रतिक्रिया रुग्णवाहिका चालक आशपाक सय्यद यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. जिल्ह्यामध्ये दिवसाला 30 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचविण्याचे काम शहरातील रुग्णवाहिका चालक करत आहेत. मात्र, हे काम करत असताना त्यांना वेगवेगळे अनुभव येत आहेत.
जेवण करण्यासाठीही वेळ नाही मिळत
घाटी रुग्णालयात असलेल्या रुग्णवाहिका चालकांकडून पूर्वी सात ते आठ मृत व्यक्तींना स्मशान भूमीत घेऊन जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे. यामुळे मृतांची संख्या देखील वाढली आहे. यामुळे रुग्णवाहिका चालक यांना दिवसाला 40 ते 45 मृतांना स्मशानभूमीत पोहोचवण्याचे काम करावे लागत आहे. यामुळे अनेकदा जेवायलाही वेळ मिळत नाही. यापूर्वी अशी परिस्थिती कधीच आली नसल्याचेही हे रुग्णवाहिका चालक सांगत आहे.
पूर्वीप्रमाणेच सर्व सुरळीत व्हाव
औरंगाबाद शहरात 350 पेक्षा जास्त रुग्णवाहिका आहेत. तर यावर उपजीविका भागवणारे 400 ते 500 कामगार आहेत. घाटी रुग्णालयात मराठवाड्यातून रुग्ण येत असल्याने यातील बहुतांश रुग्णवाहिका या घाटी रुग्णालयात असतात. मृतांची संख्या वाढल्यामुळे रोजगार जरी वाढला असला तरी या परिस्थितीत आम्हाला काम करण्याची इच्छा नाही. एक फोन वाजला की घरातला व्यक्ती कमी झालेला असतो. यामुळे लवकरच कोरोना संकट टळावे व पूर्वीप्रमाणेच सर्व सुरळीत व्हावे, अशी अपेक्षा आहे रुग्णवाहिका चालक करत आहेत.
हेही वाचा - संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी