औरंगाबाद : सेना-भाजपची युती झाल्यावर राज्यात बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षांच्या बंडखोरांनी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरले. या बंडखोरांमुळे युतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी सेना-भाजपचे स्थानिक नेते आपापल्या पातळीवर बैठक घेऊन बंडखोरांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, असा पवित्रा घेतल्याने बंड थंड करणे नेत्यांना अवघड जात असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबादमध्ये युतीच्या बंडखोरांना शांत करण्यासाठी सेना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी रविवारी दिवसभर विविध ठिकाणी बैठका घेतल्या. यामध्ये सेना आणि भाजपच्या नेत्यांनी आपापल्या पक्षातील बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - माजी आमदाराला डावलली उमेदवारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे जयंत पाटलांना रक्ताने पत्र
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार अतुल सावे यांच्याविरोधात शिवसेनेच्या राजू वैद्य यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात सेनेच्या संजय शिरसाठ यांच्या विरोधात भाजपचे राजू शिंदे यांनी, मध्य मतदारसंघात शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच सिल्लोड मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजपच्या सुनील मिरकर आणि सुरेश बनकर यांनी, वैजापूर येथे शिवसेनेचे उमेदवार विरोधात भाजपच्या दिनेश परदेशी यांनी, कन्नड येथे शिवसेनेच्या उद्यसिंग राजपूत यांच्या विरोधात भाजपचे किशोर पवार यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे युती धर्म पाळण्यासाठी आता दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपली जोरदार रणनीती आखल्याचे दिसून येते. यानंतरही बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांचा बंडपणा थंड झाला नाही. तर, त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबादमध्ये काँग्रेसला झटका; पश्चिम मतदारसंघातील उमेदवार रमेश गायकवाडांचा अर्ज बाद