छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : केंद्र सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्याची घोषणा केली. त्यानंतर शहरात वेगवेगळ्या पक्ष संघटनांनी नामांतराला विरोध केला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही, मात्र इतिहास पुसला जात आहे, असा आरोप एमआयएम पक्षाने आंदोलन सुरू केले होते. मात्र त्या विरोधाला विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांती चौक भागातून दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाची सांगता करण्यात आली. जवळपास एक किलोमीटर लांब इतकी गर्दी या मोर्चात सहभागी झाली. हजारो नागरिकांनी हातात भगवे ध्वज घेत छत्रपती संभाजी नगर या नावाला समर्थन दर्शविले आहे.
परवानगी नाही तरी निघाला मोर्चा : मागील पंधरा दिवसात नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने साखळी आंदोलन सुरू करण्यात आले होते. इतकच नाही तर 9 मार्च रोजी कॅन्डल मार्च काढून नामांतराला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. त्याचबरोबर मनसेच्या वतीने समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले, मात्र या दोन्ही मोर्चांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. शहरात वेगवेगळ्या संघटनांकडून होणारा विरोध लक्षात घेता सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये विश्व हिंदू परिषद, भाजपा, शिवसेना यांच्यासह इतर संघटनांनी सहभाग नोंदवला. मात्र सामाजिक शांतता बिघडेल, त्यामुळे परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी आयोजकांना सांगितले. तरीदेखील क्रांती चौक भागातून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह ठाकुर, शिवेंद्रे राजे भोसले यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर नेते सहभागी झाले.
एमआयएमने आंदोलन घेतले मागे : पंधरा दिवसांपूर्वी नामांतर विरोधात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी आंदोलनाला सुरुवात केली होती. जवळपास 14 दिवस आंदोलन केल्यानंतर सामाजिक स्वास्थ खराब होऊ नये, याकरिता आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा जलील यांनी केली. इतकेच नाही तर काही भडकाऊ भाषण करणाऱ्या नेत्यांना शहरात आणून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपण सर्वांचेच खासदार आहोत. त्यामुळे आपण न्यायालयीन लढाई लढू, असे म्हणत आंदोलनाला स्थगिती देण्यात आली, असे असले तरी महाराजांना विरोध करणाऱ्या लोकांना ताकद दाखवण्यासाठी हा मोर्चा असल्याचे तर भाजप नेते संजय केणेकर यांनी सांगितले.