औरंगाबाद - पाटण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गो-एअर विमानाच्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे वैमानिकाने रविवारी सायंकाळी विमान तातडीने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवले.
गो-एअरचे विमान पाटण्याहून मुंबईकडे जात होते. या विमानातून १६५ प्रवासी मुंबईला जात होते. प्रवासाच्या अर्ध्या मार्गात विमानाच्या दोन्ही इंजिनची गती कमी-अधिक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यातून विमानात काहीसा कंपही होत असल्याचा अनुभव प्रवाशांना येत होता. अशा परिस्थितीत विमानातील एसीही बंद पडला. अशा सगळ्या परिस्थितीत वैमानिकाने आपत्कालीन लँडिंगचा निर्णय घेतला.
चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाला सायंकाळी पाचच्या सुमाराला गो-एअरचे पाटणा-मुंबई विमान आपत्कालीन लॅंडिंग करणार असल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच विमानतळ प्राधिकरणाने रुग्णवाहिका, डॉक्टर, अग्निशमन विभागाला सतर्क केले. वैमानिकाने सुरक्षितरीत्या विमान धावपट्टीवर उतरविले. विमानाचे लॅंडिंग झाल्यानंतर प्रवासी विमानातच बसून होते.
बऱ्याच वेळेनंतर प्रवासी विमानातून बाहेर उतरले. विमानतळावरील सुरक्षा हॉलमध्ये प्रवाशांना थांबविण्यात आले. विमानातील एसी बंद पडल्यामुळे दोन ते तीन प्रवाशांना मळमळ व उलट्या झाल्याचे सांगण्यात आले. असे असले तरीही कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली नाही. रात्री आठ वाजेपर्यंत प्रवासी विमानतळावरच होते. प्रवाशांना चहा - पाणी व इतर सुविधा गो-एअरकडून पुरविण्यात आल्या आहेत. गो-एअरचे पथक औरंगाबादला येऊन विमान दुरुस्त करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याबरोबर अन्य विमान बोलावून प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.