औरंगाबाद - पैठण तालुक्यात अतिवृष्टी व अवेळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत. कुठल्याही कागदपत्रांच्या पुर्ततेची अट न ठेवता तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी पैठण तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
पैठण तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी व अवेळी पाऊस चालु आहे, यामुळे शेतकऱ्यांचे काढणीस आलेली पिके ज्यात मका , बाजरी, सोयाबीन, कपाशी, ज्वारीसह सर्व फळबागांचे पावसामुळे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचे पैसे देखील वसुल झालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी आणखी सावकारी पाशात अडकण्याची भिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत पोहचला आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे वैयक्तीक सरसकट पंचनामे तत्काळ करण्यासाठी तलाठी, कृषी अधिकारी यांच्या मार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. शेतकऱ्यांना कुठल्याही कागदपत्रांची पुर्तता करण्याची अट न ठेवता सरसकट नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माऊली मुळे, सरपंच आर के पटेल, राजु बोंबले उपस्थिती होती.