औरंगाबाद - मराठा आरक्षणाविरोधातील याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण मंजुर केले आहे. अशात आता मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा केला तरी मुस्लिम आरक्षणाचे काय? असा प्रश्न मुस्लिम संघटनांनी उपस्थित केला आहे.
मुस्लिम समाज मागास असून समाजातील मुलांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी काँग्रेस सरकारने आरक्षण दिले होते. त्याला न्यायालयाने देखील मान्यता दिली, मात्र सरकारने अडकाठी केल्याने अद्याप मुस्लिम मुलांना शिक्षणात आरक्षण मिळाले नाही, असा आरोप मुस्लिम जागरण समितीचे मोसीन अहमद यांनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुस्लिम समाज बांधवदेखील आंदोलनात सहभागी होते. मराठा समाजासह मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला, याचा आनंद आहे. मात्र, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत काय? असा सवाल मुस्लिम जनजागरण समितीने उपस्थित केला. मुस्लिम आरक्षणाबाबत लवकर निर्णय झाला नाही तर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जनजागरण समितीचे मोसीन अहमद यांनी दिला.