कन्नड(औरंगाबाद) कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन झालं आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात या पट्टेदार वाघाच्या पायाचे ठसे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले. त्यानंतर 15 मार्चला गौताळ्यात पट्टेदार वाघ असल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघाचे छायाचित्र कैद झाल्याची माहिती वन विभागाने दिली. आठ दशकानंतर हा वाघ आढळल्यामुळे त्याच्या संवर्धनावर वन विभागाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
गौताळा अभयारण्यात 1940 मध्ये त्यानंतर 1970 मध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाले होते. आता तिसऱ्यांदा पट्टेरी वाघाचे अस्तिव आढळले आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊलखुणा दिसल्यानंतर गौताळ्यातील वन अधिकाऱ्यांनी ट्रॅप कॅमेरे लावले. 15 मार्चला कॅमेऱ्यात पट्टेदार वाघाचा वावर असतानाचे स्पष्ट झाले. हा पट्टेदार वाघ यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून आलेला असून, तो दोन वर्षांचा आहे.
गवताळा अभयारण्यात वाघासाठी पोषक वातावरण
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून गौताळा अभयारण्यातील पर्यटन बंद असल्यामुळे प्राण्यांना मुक्तसंचार करता आला. यासह गौताळा अभयारण्यात वाघासाठी आवश्यक असलेले पोषक वातावरण आणि खाद्य उपलब्ध असल्यामुळे तो या भागात आला असावा, असा अंदाज वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे अजिंठ्याच्या जंगलातही एक वाघ आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यांची कोणाकडे नोंद नाही. दीर्घ कालावधीनंतर गौताळ्यात पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्यामुळे त्याच्या संवर्धनाची जबाबदारी वन विभागावर आली आहे. त्या दृष्टीने वन विभागातर्फे उपाययोजानांच्या हालचालीला सुरुवात झाली आहे.