औरंगाबाद - देश कारगील विजय दिवस साजरा करत आहे. मात्र, कारगिलच्या चौक्या सोडणाऱ्या विरोधात कारवाई का केली नाही, असा संतप्त प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. कारगिलमध्ये अतिरेक्यांनी कब्जा केला. त्यावेळी तिथे असलेल्या धनगर माणसाने माहिती दिली आणि नंतर कारगिल युद्ध झाले. आपण विजय मिळवला, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
औरंगाबादमध्ये बंजारा समाजाने मेळावा घेऊन आपला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला जाहीर केला. यावेळी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बंजारा समाज बांधवांना मार्गदर्शन केले. काही मंडळी आग लावणारी आहेत. इतिहासात काय घडले हे त्यांना माहित नसते, पण निवडणुकीच्या काळातच आग लावली जाते. ५ वर्षे आपली सत्ता राखण्याचा प्रयत्न केला जातो, असा टोला आंबेडकर यांनी लगावला.
समाज बदलला तर देशाची स्थिती सुधारेल. विधानसभेत चंग बांधला पाहिजे, की उच-नीच मानणार नाही, तरच वंचितांची सत्ता येणार आहे. बंजारा समाजाचा युवक आला तर स्पर्धक तयार होतील म्हणून क्रिमिलियर लावले आहे. आपला उद्धार आपणच करायचे असतो म्हणून बंजारा समाजाने चंग बांधला पाहिजे वंचितचा उमेदवार बंजारा समाज असो की इतर समाजाचा उमेदवार त्याला निवडूण दिले पाहिजे. ७० वर्षात अनेक मोर्चे आंदोलन झाली परभणीच्या विद्यापीठाला वसंतराव नाईकांचे नाव द्यावे, मी पण आंदोलनात होतो. सत्तेवर बसल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. वसंतराव नाईक महामंडळाला ५०० कोटींचा भांडवल द्यायचे असेल तर सत्तेत यावे लागेल. वंचित आघाडीचे तुम्हाला सत्तेत आणू शकते. असे वक्तव्य अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर कार्यक्रमात केले.