पैठण (औरंगाबाद) - कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊन काळात कापड व्यवसाय करण्यास निर्बंध घातले असतानाही शहरातील प्रसिद्ध कापड दुकानात कापड विक्री सुरू होती. त्यामुळे शुभसंकेत या दुकानातील गोडाऊनवर पोलीस आणि नगरपरिषदेच्या भरारी पथकाने छापा मारला. पोलिसांनी पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले असून 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शहरातील नाका रोडवरील शुभसंकेत या कापड दुकानात विना परवानगी कापड विक्री सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस, महसूल विभाग व नगरपरिषदेच्या भरारी पथकाने भवानीनगर येथील गोडावऊनवर छापा मारला. यावेळी कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करुन कापड विक्री करताना निदर्शनास आले. पोलिसांनी विक्री करणारा प्रशांत लक्ष्मण आहुजा (वय २४, रा. भवानीनगर) तसेच नोकरीला असलेल्या ५-६ जणांना ताब्यात घेतले. तसेच दुकान सील करत दीपक आहुजा या दुकान मालकावर २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. लॉकडाऊन शिथिल होईपर्यंत दुकान सील करण्यात आल्याची माहिती तलाठी भैरवनाथ गाढे यांनी दिली.
शहरातील मेन रोडवरील सरिता ड्रेसेसच्या जैनपुरा येथील गोडाऊनवर देखील महसूल विभाग आणि पोलिसांनी छापा मारला. दुकान मालक संतोष कैलास महाडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. हे दुकानही लॉकडाऊन शिथिल होईपर्यंत सील करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक छोटुसिंह गिराशे, उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, चरण बालोदे, योगेश केदारे, सोमनाथ थिटे, तलाठी भैरवनाथ गाढे आदींनी पार पाडली.