गंगापूर (औरंगाबाद) गंगापूर शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तहसीलदार अविनाश शिंगटे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्यासह नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रस्त्यावर उतरून कारवाई केली. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत राज्यात अंशत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरी देखील नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
बॅंक आणि दुकानांमध्ये जाऊन पाहाणी
नगर परिषद प्रशासनाकडून आज मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, दरम्यान यावेळी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी आपला मोर्चा बॅंकेकडे वळवला. त्यांनी शहरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन पाहाणी केली. मात्र यावेळी बॅंकेतील कर्मचारीच विनामास्क आढळून आले.
जिल्ह्यात 4 एप्रिलपर्यंत अंशत: संचारबंदी
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी जिल्ह्यात 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशत: लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. यादरम्यान जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार आहेत. तसेच दर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन राहणार असून, या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत.