औरंगाबाद - नेहेमी घराचा पत्ता बदलून शहरात राहणाऱ्यांची फसवणूक करणारा आरोपी तब्बल ४१ वर्षानंतर औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागला. तर दुसरा आरोपी तब्बल २७ वर्षानंतर सापडला. या दोन्ही आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
या फसवणूक प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र,जामिनावर सुटलेला आरोपी सापडत नसल्याने आरोपी फरार घोषित करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी तब्बल ४१ वर्षानंतर सापडला.आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
१९८० साली फसवणूक प्रकरण ....
महेमूद खान हसन खान (रा. जाधववाडी) असे आरोपीचे नाव आहे. याला सिटीचौक पोलिसांनी १९८० साली फसवणूक प्रकरणात अटक केली होती. मात्र, आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याला कोणीही काहीही विचारले नाही. तो न्यायालयात जायचा, मात्र केस बंद झाल्याचे समजल्यावर तो बिनधास्त राहत होता. फरारी (वॉण्टेड) यादीत त्याचे नाव असल्याचे ४१ वर्षांनंतर पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर शोध घेऊन पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली.
आरोपींचा नवा घर नवा डाव...
न्यायालयीन सुनावणीला हजर न राहणाऱ्या आरोपीविरुद्ध प्रथम तीन समन्स काढले जातात. या समन्सना प्रतिसाद न मिळाल्यास अटक वॉरंट काढले जाते. पोलीस त्या वॉरंटनुसार आरोपीचा शोध घेतात. मात्र, आरोपी घराचा पत्ता बदलून नवा घर नवा डाव प्रकार सुरू करत असतो. यामुळे पोलिसांना आरोपी सापडत नाही, असा अहवाल पोलिसांनी पाठविल्यावर न्यायालय त्या आरोपीविरुद्धचा खटला प्रलंबित ठेवून आरोपीला फरार घोषित करत होते.
२७ वर्षांपासून फरार चोर ...
गेल्या २७ वर्षापूर्वी सिडको एन ३ येथील महेंद्र दिलीपचंद कोठारी यांचे घर फोडल्याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात दाखल गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. या गुन्हातील आरोपी शंकर बन्सी साखळे हा फरार होता. गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक योगेश धीरे यांनी त्याला २७ वर्षांनी तीसगाव परिसरात अटक केली.