औरंगाबाद- आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपात घेऊ नये यासाठी सिल्लोडच्या भाजप कार्यकर्त्यांनी दबावतंत्र वापरत पक्ष प्रवेश टाळला. मात्र तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश' यात्रेत मुख्यमंत्र्यांनीच अब्दुल सत्तार यांना आपल्या गाडीत सोबत घेतले. त्यामुळे सत्तार यांचा भाजप प्रवेशाचा थंड झालेला मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहाजनादेश यात्रा सिल्लोड येथे दाखल झाली त्यावेळी भाजप स्थानिक कार्यकर्ते आणि सत्तार समर्थक, असे दोन गट सहज दिसत होते. प्रियदर्शनी चौकात भाजपचा गट महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी उभा होता. यात्रा येथे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वागत स्वीकारले तर पुढे आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांसोबत आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना आपल्या गाडीत बसवले, त्यांचा सत्कार स्वीकारला व तेथे हजर असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले.
बस वर चढताना अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी हात दिला आणि आपल्या सोबत घेतले. यावेळी सिल्लोड येथील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत गाडीवर विराजमान झालेल्या आमदार सत्तार यांनी पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला २५ लाखाचा धनादेश दिला. या सर्व घडामोडी लक्षात घेता अब्दुल सत्तार यांचा भाजपात प्रवेश निश्चित समजला जात आहे.
अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नका अशी ओरड पक्षातील कार्यकर्ते करत आहे. मात्र घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेता ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सत्तार यांचा भाजपात प्रवेश झाल्यास आश्चर्य वाटायला नको, हेही तितकेच खरे आहे. असे असले तरी पक्षप्रवेशाबाबत सत्तार यांचे कुटुंबीय अजूनही असे काही नसल्याचे सांगत आहे.