औरंगाबाद - शेत वस्तीवर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी मध्यरात्रीच्या वेळी अत्याचार केल्याची घटना घडली. ही खळबळजनक घटना पैठण तालुक्यातील थेरगाव शिवारात रविवार दिनांक 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. या घटनेविषयी पाचोड पोलिसात दोन आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीवर नजर ठेवून होते-
पैठण तालुक्यातील थेरगाव येथील अल्पवयीन मुलीगी ही आपल्या आई-वडिलांबरोबर थेरगाव शिवारातील शेत वस्तीवर राहते. आई-वडील हे शेतामध्ये कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच परिसरात शेत वस्तीवर राहणारे आरोपी युवक जुनेद दस्तगीर पठाण व दीपक आहिरे हे अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलीवर नजर ठेवून होते.
रविवार दिनांक 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास जुनेद पठाण व दीपक आहेर यांनी अल्पवयीन मुलीच्या परिवारातील मंडळींच्या मोबाईलवर दोन ते तीन वेळा फोन केले. रात्रीच्या वेळी सगळे परिवारातील झोपी गेले असल्याने अल्पवयीन मुलीने फोन उचलला. तर आम्ही तुमचे नातेवाईक आहोत, असे हे दोन तरुण सांगत होते. मात्र शेत वस्तीवर असलेल्या घरामध्ये मोबाईलला नेटवर्कचा अडथळा होता. त्यामुळे संभाषण व्यवस्थित होत नसल्याने ती मुलगी फोन घेऊन घराच्या बाहेर आली.
जिवंत मारण्याची दिली धमकी-
मुलगी बाहेर येताच या दोन तरुणांनी तिचं तोंड दाबून तिला शेतामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. व तिला घरी सांगितल्यास जिवंत मारून टाकू, अशी धमकी देत तेथून पळ ठोकला. मात्र या अल्पवयीन मुलीने रडत रडत हा झालेला प्रकार सकाळी तिच्या आई-वडिलांना सांगितला. आई-वडिलांनी तात्काळ पाचोड पोलीस स्टेशन गाठले व या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना देऊन अत्याचार करणाऱ्या आरोपी जुनेद दस्तगीर पठाण वय वर्षे 23 व दीपक आहेर या दोघांविरुद्ध कलम 376 सह आदी कलमांखाली अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा तपास औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, पैठण उपविभागीय पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत असून या घटनेतील आरोपी फरार आहेत. रात्री उशिरापर्यंत पाचोड आरोपींचा शोध घेत आहेत.
हेही वाचा- अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; सीबीआयकडे तपास देणारी याचिका फेटाळली
हेही वाचा- कृषी कायद्याविरोधात आघाडीची भूमिका दुटप्पी, पवारांचीच कायद्याला शिफारस - फडणवीस यांचा घणाघात ...