औरंगाबाद - घराचा मागचा दरवाजा तोडून घरफोडी करणाऱ्या चोराला जिन्सी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरन शाखेने चोवीस तासात अटक केले. मोहंमद सिद्दीक उर्फ सिद्धू खालेद चाऊस (वय -२८, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड) असे संशयित चोराचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. त्याच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला. शुक्रवारी बायजीपुरा भागामध्ये चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, कलीम पठाण फरमान पठाण (वय - ४०, रा. गल्ली क्र. २२, इंदिरानगर) यांच्या घरात शुक्रवारी रात्री पाठीमागील दरवाजा तोडून संशयित आरोपी मोहंमद सिद्दीक आत शिरला. त्यावेळी त्याने घरातून रोख व मोबाईल असा २५ हजार पाचशे रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास चक्रे फिरवली. उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना तो हर्सूल भागात असल्याची माहिती मिळाली, त्यांनी तत्काळ सहायक फौजदार रफी शेख, संपत राठोड, शेख शकील, बेडवाल, जेढर, हारुण शेख, सुनील जाधव, गणेश नागरे, प्रविण टेकले आणि जिवडे यांच्या सोबत हर्सूल येथून पकडले. त्याच्यावर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दरोड्याची तयारी करणे आणि चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत.