औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील पिशोर येथील एका तरुणाने स्वतःच्या शेतात चिक्कूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. रोहित प्रकाश नवले असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पिशोर पोलिसांना या विषयी माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी रोहितला जागेवर तपासून मृत घोषित केले.
दिगर परिसरातील निवृत्त हवाई दलाचे कर्मचारी प्रकाश नवले यांचा रोहित हा एकुलता एक मुलगा आहे. बुधवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत रोहित घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोबाईलवर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रोहितच्या वडिलांनी गावातील त्यांचे भाऊ आणि इतर नातेवाईक यांचेकडे अधिक विचारपूस केली.
रोहितचा कोठेच ठावठिकाणा न लागल्याने प्रकाश नवले आणि त्यांचा पुतण्या विलास नवले यांनी त्याचा अधिक शोध घेतला. गावाजवळील त्यांच्या स्वतःच्या शेतात (गट क्र. 9) मध्ये एका चिक्कूच्या झाडाला रोहितने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. पिशोर पोलिसांना या विषयी माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी रोहितला जागेवर तपासून मृत घोषित केले.
नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तरुणाच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. गुरुवारी सकाळी रोहितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर अंतरप, पोलीस शिपाई खेडकर अधिक तपास करीत आहेत. रोहित हा सर्व मित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये अतिशय संयमी आणि आनंदी मुलगा म्हणून परिचित होता. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांना धक्का बसला.