औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे, यात पोलीस विभाग देखील मागे नाही. मालेगाव येथील बंदोबस्तासाठी औरंगाबादमधून गेलेले 'भारत बटालियन'चे जवान शहरात परतले आहेत. यामधील तब्बल 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबादच्या सातारा परिसरात राज्य राखीव पोलिस बलाचा कॅम्प आहे. मालेगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी औरंगाबाद येथून भारत बटालियनचे 96 जवान पाठवण्यात आले होते. तेथील बंदोबस्ताचे काम झाल्यानंतर त्यांना औरंगाबादला परत बोलावण्यात आले आहे. या सर्व जवानांची वैद्यकीय तपासणी केली असता, यामधील 72 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी सुमारे 134 जवानांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 112 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 72 जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेल्या जवानांना मास्क, सॅनिटायझर आणि इतर साहित्य वाटपासाठी एक जवान पाठवण्यात आला होता. तो औरंगाबादला आल्यावर त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात त्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या बटालियनमधील संबंधीत जवानाच्या संपर्कात आलेल्या 64 जवानांना अगोदरच क्वारंटाईन करण्यात आले होते.