छत्रपती संभाजीनगर: देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी अद्याप शेतीसाठी वीज देण्याबाबत अडचणी सुटल्या नाहीत. दिवसा वीज द्या अशी मागणी वारंवार केली जात असताना रात्री वीज देऊ अशी भूमिका सरकारची असते. मात्र पुढील दीड वर्षात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा दावा महावितरण तर्फे करण्यात आला आहे. सोलारच्या माध्यमातून सात हजार वॉट वीज निर्मिती तयार करण्याचे नियोजन आहे. यातून स्वस्तात वीज मिळेल, शिवाय उद्योगांना लागणारे वाढीव दर देखील कमी होतील अशी माहिती महावितरण अतिरिक्त संचालक विश्वास पाठक यांनी दिली.
सोलार प्रकल्प उभारणार: शेती व्यवसाय आधीच अडचणीत असताना त्याला लागणारी पुरेशी वीज देणे देखील सरकारला शक्य होत नाही. मात्र आता शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी राज्यात खाजगी शेती आणि सरकारी जमिनीवर सोलार निर्मिती केली जाणार आहे. नापीक जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शक्य आहे त्याठिकाणी विकत तर काही ठिकाणी तीस वर्ष लिजवर जमीन घेतली जाणार आहे. त्यासाठी एक लाख 25 हजार प्रती हेक्टर प्रमाणे भाडे आकारण्यात येईल. तर प्रत्येक वर्षी तीन टक्क्यांची वाढ त्यात केली जाईल. या निमित्ताने नव्याने मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती विश्वास पाठक यांनी दिली.
तीन वर्ष मिळणार मानधन: शेतकऱ्यांना पुरेसे वीज देण्यासाठी सोलार पद्धतीने वीज निर्मिती करण्यात येणार आहे. महावितरण सब स्टेशन परिसरात दहा किलोमीटर अंतरावर जागा शोधली जाईल. वर्षाला 7000 वॅट वीज निर्मिती होईल असा प्रकल्प राज्यात उभारला जाणार आहे. पुढील दोन वर्षात पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी गुंतवणूकदारांसाठी देखील वेगळी योजना करण्यात आली आहे. जे उद्योजक या प्रकल्पात गुंतवणूक करतील, त्यांना 25 पैसे युनिट अतिरिक्त दर देण्यात येईल. तर ज्या ग्रामपंचायत यासाठी सहकार्य करतील त्यांना वर्षाला पाच लाख असे तीन वर्ष मानधन देण्यात येणार आहे. सर्व प्रकल्पासाठी 700 कोटींचा अतिरिक्त निधी दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज: शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना अतिरिक्त भार पडू नये याकरिता सरकार सवलतीच्या दरात वीज दिली जाते, मात्र ती वीज पुरेशी नसते. त्यामुळेच सोलार निर्मितीचा प्रकल्प राज्यभर उभा करणार असून एकूण वापराच्या 30 टक्के वीज त्यातून निर्मिती होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. विज निर्मिती करताना आठ रुपये युनिट प्रती दराने दर आकारले जातात. मात्र नुकसान भरून काढण्यासाठी अतिरिक्त भार उद्योजक आणि व्यावसायिकांना वीज वाढीव दरात दिली जाते. नवीन प्रकल्प सुरू झाल्याने शेतकऱ्यांना तीन रुपये तीस पैसे या सवलतीची दरात वीज देणे शक्य होईल. तर उद्योजक आणि व्यावसायिकांवर पडणारा अतिरिक्त भार कमी होईल. परिणामी त्यांना देखील वीज स्वस्त देणे शक्य होईल. त्यामुळे हा प्रकल्प सुरू झाल्यास बऱ्याच वर्षांची मागणी पूर्ण होईल आणि कायमस्वरूपी ही उपायोजना कार्यान्वित असेल. असा विश्वास महावितरण अतिरिक्त संचालक विश्वास पाठक यांनी दिली.