औरंगाबाद- औरंगाबाद महानगर पालिका उपमहापौर निवडणुकीत पक्षाला मतदान न करता गैरहजर राहणाऱ्या आणि अपक्ष उमेदवाराला मतदान करणाऱ्या एमआयएमच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे. एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी याबाबत माहिती दिली.
भाजप नगरसेवक विजय औताडे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्याने औरंगाबाद महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ ५१ मत घेत उपमहापौर पदी विराजमान झाले. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलखे यांना ३४ मत पडली. तर विरोधी पक्ष नेते असलेल्या एमआयएमला २५ नगरसेवक असताना देखील अवघी १३ मत पडली. निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून जफर खान उर्फ जफर बिल्डर यांनी निवडणूक लढवली. मात्र, २५ नगरसेवक असताना फक्त १३ मत त्यांना मिळाली. एमआयमचे ५ नगरसेवक गैरहजर राहिले तर एका नगरसेवकाने अपक्ष उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे, पक्षादेश पाळला नसल्याने सहा नगरसेवकांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली.
आम्ही उपमहापौर पद जिंकणार नव्हतो. मात्र, पक्ष म्हणून महानगर पालिकेत आमची ताकद दाखवणे गरजेचे होते. मात्र, आमच्या काही नगरसेवकांनी तस केले नाही. पक्षाचा आदेश असताना देखील गैर हजर राहिल्याने ५ नगरसेवकांचे तर भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान केल्याने एका नगरसेवकाची हकालपट्टी केल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. हकालपट्टी केलेल्या नागरसेवकांमध्ये सायरा बानो अजमल खान, संगीता सुभाष वाघुले, नसीम बी सांडू खान, विकास एडके, शेख समीना शेख इलियास, सलीमा बाबूभाई कुरेशी यांचा समावेश आहे. ऐन महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांनी पक्षादेश न पाळल्याने पक्षात फूट पडण्याचे संकेत मिळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा- चोरीच्या घटनांनी वर्ष गाजले; बलात्कार, दुखापत, जबरी चोरीच्या घटनांमध्ये वाढ