औरंगाबाद - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे परिसरासह औरंगाबादमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांच्या रुग्ण संख्येने पाचशेचा आकडा पार केला आहे. आज (शनिवार) दिवसभरात औरंगाबादमध्ये कोरोनाचे 27 रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या 508 वर पोहोचली आहे.
शहरातील पुंडलीकनगर हा भाग नवा हॉटस्पॉट ठरला आहे. तर खुलताबाद - गंगापूरसारख्या ग्रामीण भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला असल्याने कोरोना ग्रामीण भागात शिरकाव करेल अशी भीती निर्माण झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच शिरकाव केला आहे. शुक्रवारी कोरोनाचे 100 रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा त्यात भर पडली आहे. जुन्या भागांसह काही नवीन भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
सकाळी 17 तर सायंकाळी 10 नवे रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्येने 500 चा आकडा पार केला आहे. सकाळी संजयनगर - 6, कटकट गेट - 2, बाबर कॉलनी - 4, असेफीया कॉलनी - 1, भवानीनगर - 2, रामनगर - 1, सिल्क मिल - 1 असे रुग्ण आढळून आले असताना सायंकाळी गंगापूर येथे 1, पुंडलीक नगर भागात 9 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रोज किमान 25 ते 30 नवे रुग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे. रोज वाढत असलेले रुग्ण चिंतेची बाब ठरत आहे. तसेच एका कोरोनाबाधित 30 वर्षीय महिलेने मुलीला जन्म दिल्याची माहिती घाटी रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत 32 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत.