औरंगाबाद- शेततळ्यात पोहायला गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडायला लागल्यानंतर त्यांना वाचवायला गेलेले वडील आणि आणखी दोन भावंडांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे ही घटना घडली आहे.
हेही वाचा- इस्लामपूरच्या सईने साजरा केला 'अशा' पद्धतीने आपला 'लॉकडाऊन वाढदिवस'
पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील कोरडे वस्तीतील लक्ष्मण निवृत्ती कोरडे हा शेततळ्यात सार्थक लक्ष्मण कोरडे (6 वर्ष), वैभव रामनाथ कोरडे (10 वर्ष), अलंकार रामनाथ कोरडे (9 वर्ष), ज्ञानदेव कोरडे (10 वर्ष) या चौघांना पोहायला शिकवत होते. त्यातील वैभव कोरडे, अलंकार कोरडे या दोघांना थोडे पोहता येत होते. तर सार्थक कोरडे, ज्ञानदेव कोरडे हे शिकत होते. लक्ष्मण कोरडे यांनी चौघांना कसे पोहाचे हे सांगून तळ्याच्या बाहेर आले. परंतु, थोड्या वेळात मुलांची आरडाओरड ऐकायला आली. लक्ष्मण कोरडे हे तळ्यावर गेले असता, त्यांना सार्थक, समर्थ हे बुडतांना दिसले.
लक्ष्मण यांनी त्यांना वाचवण्यासाठी तळ्यात उडी घेतली. मात्र, त्या चौघांसह लक्ष्मणही बुडाले. या घटनेची माहिती कोरडे परिवारातील नातेवाईकांना व विहामांडवा ग्रामस्थांना कळताच सर्वांना शेततळ्यातून काढून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टर घुगे यांनी तपासून सर्वांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे पाचोड व विहामांडवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड मदने करत आहेत.