औरंगाबाद - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. आता औरंगाबादमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. आज (शनिवार) एकाच दिवशी ५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. येथील एकूण रुग्णसंख्या ही ४९ वर पोहोचली आहे.
गेल्या दोन दिवसात औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर असेंफिया कॉलनी, समता नगर, बिलाल कॉलनी बरोबर आता किलेअर्क या नवीन परिसरात कोरोनाने शिरकाव केल्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये हिलाल कॉलनीतील एकाच कुटुंबातील ३ महिला रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सकाळीच प्राप्त झाला. तर सायंकाळी टाऊन हॉल परिसरातील 70 वर्षीय पुरुष आणि किलेअर्कमधील 60 वर्षीय महिला अशा एकूण ५ कोरोनाबाधित रुग्णांची आज भर पडली. जिल्हा रुग्णालयात 18 कोरोनाबाधित रुग्णांवर, तर घाटीत चार अशा एकूण 22 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर 22 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेत, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
ऐरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 49 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शनिवारी एकूण 88 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 31 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 65 जणांचे लाळेचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. 110 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. औरंगाबाद विभागांतर्गत ८ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 73 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी औरंगाबाद येथे 49 रुग्ण, जालना-२, परभणी-१, हिंगोली-8, नांदेड-१, लातूर-9 आणि उस्मानाबाद-३ असे रुग्ण आढळून आले.