छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित आहे. इथे प्राचीन विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे. या ठिकाणी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्या अनुषंगाने पोलिसांनी शांतता कमिटीची बैठक घेत नागरिकांना काही सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या. त्यावेळी पंढरपूरच्या आसपास असलेल्या रहिमपूर, नारायणपूर, शेंदूर, वादा, तुर्काबोध, वाळुज अशा 41 गावातील मशिदींच्या इमाम आणि मुलींनी बैठकीला हजेरी लावली. यात, हिंदूंच्या पवित्र सण आहे, बहुतांश बांधव उपवास ठेवतात. त्यामुळे अशा पवित्र सणाला यंदा ईदच्या दिवशी कुर्बानी देणार नसल्याची भूमिका घेण्यात आली.
हिंदूंचा महत्त्वाचा सण : मुस्लिम बांधवांसाठी ईद आणि बकरी ईद हे सण महत्त्वाचे असतात. त्यात कुर्बानी देणे ही त्यांची प्रथा असते, मात्र यंदा आषाढी एकादशी असल्याने या प्रथेत थोडा बदल करण्यात आला आहे. हिंदूंचा महत्त्वाचा सण असल्याने 29 ऐवजी 30 जून रोजी ही कुर्बानी द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. याबाबत शुक्रवारी प्रत्येक भागात असलेल्या मुख्य नमाज अदा केल्यानंतर, येथील इमाम आणि मौलाना मुस्लिम बांधवांना याबाबत आवाहन करणार आहेत. मंदिर परिसरातील मांस विक्रीचे दुकान देखील बंद ठेवण्यात येतील अशी माहिती देखील शांतता कमिटीच्या बैठकीत देण्यात आल्याचे माजी सरपंच शेख अख्तर यांनी सांगितले.
मुस्लिम बांधवांची साथ : जिल्ह्यातील वाळूज भागात प्रती पंढरपूर आहे. या मंदिरात लाखो भाविक आषाढी निमित्त दर्शनासाठी येतात. गेल्या दोन वर्षांपासून आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे सण सोबत येत आहेत. मुस्लिम बांधव सहकार्य करत असल्याने आम्हाला आनंद होतो, असे मत विठ्ठल रुक्मिणी मंदिर अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले. दरवर्षी मुस्लिम बांधव मंदिर परिसरात सेवाभावाने मदत करतात, मागच्या वर्षी देखील वाळूज परिसरात कुर्बानी दिली नव्हती. यंदा इतर गावातील नागरिकांनी देखील त्याला प्रतिसाद देत दुसऱ्या दिवशी सन साजरा करण्यास निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही आभारी राहू, असे देखील राजेंद्र पवार यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली बैठक : शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पोलीस निरीक्षक आणि अविनाश आघाव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके, मेहबूब चौधरी, शेख अख्तर, ग्रामपंचायत सदस्य अमीर पठाण, शेख जावेद, शाहेबाज चौधरी, रोशन शहा, अक्रम पटेल, मौलाना अमीर सलीम पटेल, शेख जावेद, अब्दुल रशीद, हाफिज मोईन इत्यादी बांधवांनी सहभाग नोंदवला.
हेही वाचा :
- Ashadhi Ekadashi 2023: अनोखे हिंदु मुस्लिम ऐक्य, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा 'या' गावात निर्णय
- Bakri Eid 2023: अंबरनाथमध्ये बकरी ईदीच्या कुर्बानीसाठी 'शेरू'ची किंमत १ कोटी १२ लाख ७८६ रूपये; कारण ऐकून व्हाल चकित
- Ashadi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त हिंदू बांधवांसाठी मुस्लिम समाजाची अशीही 'कुर्बानी'