औरंगाबाद - शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा जबरदस्त राडा झाला. बाहेरून महाविद्यालय परिसरात आलेले विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये ही हाणामारी झाली आहे. यामध्ये काही राजकीय कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 3 विद्यार्थी जखमी झाले आहेत.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी जेवत होते. त्यांचा द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर बाहेरून चार जण महाविद्यालयात आले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात भांडणाला सुरुवात झाली. या भांडणामध्ये स्वप्निल सोनवणे, अभिजित राऊत यांच्यासह एक जण जखमी झाला, तर वाद सोडवण्यासाठी गेलेला अमोल केंद्रे यांच्या डोळ्याला जखम झाली आहे.
मारहाण करणारे तरुण राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली. किरकोळ वादातून भांडण झाले असून जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वेदांत नगर पोलीस अधिक तापस करीत आहे.