औरंगाबाद- वैजापुर तालुक्यातील तलवाडा गावात डेंग्यूने थैमान घातले असुन तीन चिमुकले दगावल्याची घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील दोन आणि ईतर एका चिमकुलीचा मृत्यु झाल्यानं तलवाडा गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र भितीचे वातावरण आहे.
रुपाली सुभाष रोकडे (10) हीचा गुरूवारी डेंग्यूने मृत्यु झाला आहे. तर पंधरा दिवसापुर्वी याच कुटुंबातील चैताली (६) या चिमुकलीचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता. एक महिण्यापुर्वी याच गावातील शायना शहिद शेख या मुलीचा देखील डेंग्यूने बळी गेला असून, एकुण तीन चिमुकले या आजाराने दगावले आहेत. त्यातच रोकडे कुटुंबातील दिपाली ही देखील आजाराने ग्रासली असुन तिच्यावर नांदगाव येथे उपचार सुरु आहेत. गावात एकाच कुटुंबातील दोन मुली दगवल्याने रोकडे कुटुंब व तलवाडा गावावर शोककळा पसरली असून गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी आमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी इंदुरीकर, जिल्हा हिवताप कार्यालय औरंगाबाद येथील आरोग्य परिवेक्षक डि.एस. गोराडे, ए.बी.आगळे, व्हि. एस. जक्कल, यांनी तलवाडा गावाला भेट देत पहाणी केली. तसेच ग्रामस्थांना कोरडा दिवस पाळण्याचे अवाहन करत पाणीसाठे नष्ट करण्याचे अव्हान केले आहे.
तलवाडा हे गाव लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असुन आरोग्य विभागाने कुठलीच उपाय योजना गावात राबवली नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे. तीन बालक दगवल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. गावातील रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतल्या जात आहेत. तलवाडा गावात आरोग्य यंत्रना कुचकामी ठरत असून वराती मागुन घोडे नाचवले जात आहेत. आरोग्य विभाग आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार. असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.