औरंगाबाद - अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेला आजपासून सुरुवात झाली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या दोन गावात या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड आणि सिल्लोड येथे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत.
ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे, त्यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले जात आहे. आज पाचोड येथे जिल्हा बँकेतील ९६, एसबीआयचे ४६, ग्रामीण बँकेचा १, बँक ऑफ महाराष्ट्रचे ९८, बँक ऑफ बडोदाचा १ कर्जदार आज कर्जमुक्त झाले. पाचोड येथील एकूण २४२ शेतकरी आज कर्जमुक्त झाले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. 68 गावांमधील 15 हजार शेतकऱयांची पहिली यादी जाहीर झाली आहे. विधीमंडळाच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ही यादी जाहीर करण्यात आली. 34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे. या याद्यांमध्ये 68 गावातील 15 हजार 368 लोकांची नावे आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावांचा समावेश यात आहे. 4 हजार 500 जणांना आधार प्रमाणपत्र दिले आहे. 24 तासात त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड आणि सिल्लोड येथे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या लावण्यात आल्या आहेत. कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाल्यानंतर डोक्यावरचे ओझे कमी झाल्यासारखे वाटत असल्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये होत्या. तसेच इतरांचीही नावे लवकर जाहीर करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
हेही वाचा -
ट्रम्प यांच्या दौऱ्यातून भारत-अमेरिका संबंध दृढ होतील - डॉ. शैलेंद्र देवळणकर