औरंगाबाद - येथील गिरीराज हाऊसिंग सोसायटीतील दोन वेगवेगळ्या परिवारामध्ये दोघांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विलास सुभाष भांबरे (वय-32) आणि श्वेता नवनाथ गिरी (वय-21) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
पहिली घटना ही रात्री साडेबाराच्या सुमारास समोर आली. विलास भांबरे हा वेल्डिंगची कामे करायचा. रात्री १० च्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून त्याचा भावासोबत वाद झाला होता. त्यानंतर भाऊ ज्ञानेश्वर हा नोकरीवर गेला आणि विलास हा रात्री उशिरा पर्यंत टीव्ही पाहत बसला होता. त्यानंतर त्याच्या खोलीत झोपायला गेला. मात्र, रात्री १२ च्या सुमारास पती खोलीत दिसत नसल्याने पत्नी शुभांगी हिने बाजूच्या खोलीत जाऊन पाहिले असता, विलासने छताला गळफास घेतल्याचे दिसले. त्याला फासावरून खाली उतरवून रुग्णालयात हलविले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - वाईन शाॅपच्या मॅनेजरचा खून करणाऱ्या 'त्या' टोळीचा पर्दाफाश
त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या श्वेता गिरी हिनेही राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत श्वेता आणि नवनाथ गिरी यांची फेसबुकवरून मैत्री झाली होती. त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले व ऑक्टोबर महिन्यात या दोघांनी प्रेमविवाह केला. लग्नाला अवघे २ महिनेही होत नाहीत तर, बुधवारी पहाटे श्वेताने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्नानंतर आनंदी असलेल्या श्वेताने अचानक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ठ होऊ शकलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा मृत्यू; 'ते' स्वप्न अर्धवटच राहिले