औरंगाबाद - शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोनने वाढली आहे. मुंबईहून शहरात आलेल्या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याच समोर आले आहे, तर इतर एक जणाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या आता 27 वर पोहोचली आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या 17 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाल्याच निष्पन्न झाले होते. या मुलाच्या गर्भवती आईला देखील कोरोनाची लागण झाल्याच समोर आले आहे. आज लागण झालेले दोनही रुग्ण किराडपूर येथील रहिवासी असल्याने औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. या तिघांपैकी एका रुग्णावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्याचा अहवाल दुसऱ्या वेळेस पॉझिटिव्ह आला आहे, तर दोन रुग्ण नव्याने बाधित झाले आहे. 10 एप्रिलला मुंबई पोलिसांची परवानगी घेऊन एक कुटुंब शहरात दाखल झाले होते. गर्भवती महिलेवर उपचार घेण्यासाठी त्यांना औरंगाबादला येण्याची परवानगी देण्यात आली होती. या कुटुंबात असलेल्या 17 वर्षीय मुलाला लागण झाल्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाला होता. त्याच्या आईचा अहवाल आज प्राप्त झाला असून तिला देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याच निष्पन्न झाले, तर आणखी एकाला संसर्ग झाल्याच उघड झाले आहे. दोन्ही रुग्ण किराडपुरा भागातील आहे. त्यामुळे किराडपुरा भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नव्याने दोन रुग्ण आढळून आल्याने बाधित रुग्णांची संख्या 27 वर गेली आहे. या रुग्णांमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाले आहे, दोन रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनासमोर चिंता वाढली आहे.