औरंगाबाद - शुक्रवारी भल्या पहाटेच एक मोठी भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. एक जण गंभीर जखमी झाला आहे.
सर्व मजूर मध्यप्रदेशातील उमरीया आणि शाहडोल जिल्ह्यातील होते. गावी जाण्यासाठी पायी निघाले असता त्यांना रेल्वेने चिरडले. या घटनेवर पंतप्रधान मोदींनीही दु:ख व्यक्त केले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी बोलणे झाले असून याप्रकरणी ते लक्ष ठेवून आहेत, असे ट्विट मोदींनी केले आहे.
सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे. मात्र, रेल्वेने मालवाहतूक काही प्रमाणात सुरू केली आहे. गुरुवारी (ता. ७) रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी भोपाळला एक गाडी रवाना केली. त्यामुळे आपल्यालाही एखाद्या अशाच गाडीने गावी जाता येईल, या आशेने जालन्याच्या एका स्टील कंपनीचे ते मजूर रातोरात भुसावळकडे पायी निघाले होते. मात्र, प्रवासातच त्यांचा करुण अंत झाला.
रात्र झाली म्हणून रुळावरच झोपले
बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच त्यांनी पथारी पसरली आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे धडधडत येणाऱ्या मालगाडीचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे सर्वजण मालगाडीखाली चिरडले गेले. यात १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १ जण जखमी झाला आहे.
जखमींवर उपचार करण्यासाठी पूर्णा (जि. परभणी) जंक्शन येऊन रेल्वे रुग्णवाहिकाही निघाल्याचे वृत्त आहे. यात रेल्वेचे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत.
सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहेत. सर्व मजूर जालन्यातील एका स्टील कंपनीत कामाला होते व सर्वजण मध्यप्रदेश राज्यातील होते. लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात परतण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र घरच्या ओढीने सैरभैर झालेल्या कामगारांना घरी परतण्यापूर्वीच मृत्यूने कवटाळले.
रेल्वे बंद असल्यामुळे गाडी येणार नाही या समजातून झोपले रुळावर
लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. मात्र सरकारने राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्यांची व्यवस्था केली आहे. काल (गुरुवारी) औरंगाबादहून भोपाळला एक विशेष गाडी रवाना करण्यात आली होती. आपल्यालाही अशाच एखाद्या गाडीने घरी परतता येईल या आशेने जालन्यातील हे मजूर रात्रीच औरंगाबादच्या दिशेने रेल्वे रुळावरूनच पायी निघाले. रेल्वे सेवा बंद असल्याने रुळावरून कोणतीच गाडी येणार नाही, या समजातून सर्व मजूर रुळावरच झोपी गेले, मात्र हा समजच त्यांच्या जीवावर उठला व हकनाक १६ मजुरांचा बळी गेला.
रस्त्यात करमाडजवळ रेल्वे पटरीवर रात्री त्यांनी आसरा घेतला आणि रेल्वे सध्या बंद आहे कुठलीही रेल्वे येणार नाही, असा समज असल्याने ते रेल्वे पटरीवर झोपले. जवळपास 17 जन रेल्वे पटरीवर झोपले होते. सकाळी सहाच्या सुमारास मालगाडी आली आणि या सर्व मजूरांना चिरडून निघून गेली.
जालन्यातील स्टील कारखान्यात होते कामाला
यामध्ये जवळपास १६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण यामध्ये जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना परभणी झोनमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे सर्व मजूर जालन्याच्या स्टील कारखान्यात काम करत होते. औरंगाबादहून मध्यप्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे त्या रेल्वेत आपली काही व्यवस्था होते का, हे पाहण्यासाठी हे मजूर औरंगाबादकडे येत होते, अशी माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे.