औरंगाबाद - शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण देखील बरे होत आहेत. दौलताबाद येथील कोरोनाची लागण झालेला 10 वर्षीय मुलगा बरा होऊन घरी परतला. यावेळी त्याचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.
दौलताबाद येथील लहान मुलाला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर तो पूर्णपणे बरा झाला असून रविवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तो येणार म्हणून गावातील नातेवाई आणि मित्रमंडळींनी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी केली. तो गाडीतून उतरताच त्याच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्याने हात उंचावून हसत हसत सर्वांचे आभार मानले. इतकंच नाही तर काही जणांनी त्याचा व्हिडिओ करून टिकटॉकवर टाकला. त्यामधून आपण कोरोनाला हरवू शकतो असा संदेश देण्यात आला.
रविवारी दिवसभरात ५० जण कोरोना पॉझिटिव्ह -
रविवारी पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले. दिवसभरात कोरोनाचे 50 नवे रुग्ण आढळून आले, तर आठ जणांना घरी सोडण्यात आले. शहरात कोरोनाचे नवे हॉट स्पॉट आढळून येत असून रोज रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे.