औरंगाबाद - ऐन उन्हाळ्यात लग्नात नाचायचे म्हणजे उत्साहात असलेले कंटाळवाणे काम. मात्र, आता उन्हातदेखील त्याच उत्साहात नाचता यावे, याकरिता औरंगाबादेत फिरता मंडप साकारण्यात आला आहे. सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठानने हा आगळा-वेगळा फिरता मंडप साकारला आहे. या मंडपामुळे कडक उन्हातदेखील आनंदाने आपण लग्नात नाचण्याचा आनंद घेऊ शकतो.
उन्हाळा आला की तशी लग्नसराईला सुरुवात होते. लग्नात दुपारचा मुहूर्त निघाला म्हणजे वर पक्षातील अनेकांना लग्नात कडक उन्हात नाचावे कसे असा प्रश्न पडतो. वरातीत नाचण्याची इच्छा प्रत्येकाची असते. नवरदेवाचे मित्र जोशात नाचतात देखील, मात्र उन्हामुळे प्रकृतीवर परिणाम होणाच्या भीतीने अनेकांना नाचण्यापासून मुकावे लागते. त्यामुळे कितीही कडक ऊन असो लग्नात नाचता यावे, सर्वांना नाचण्याचा आनंद घेता यावा, यासाठी कुलस्वामिनी प्रतिष्ठानने हा फिरता मंडप तयार केला आहे.
हा नुसता मंडप नसून या मंडपावर सामाजिक संदेश लिहून जनजागृती करण्यात आली आहे. सामाजिक संदेश दिल्याने समाजात थोडा बदल होईल, अशी अपेक्षा कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या सदस्यांना वाटते. औरंगाबादेत सर्वात आधी ही संकल्पना राबवण्यात आली. सुंदर सुशोभित केलेला आकर्षक असा उन्हापासून रक्षण करणारा मंडप सर्वांचे आकर्षण ठरत आहे. या संकल्पनेने नुसते वरपक्ष नाही तर वधूपक्ष देखील नाचण्याचा मोह आवरू शकत नाहीत.