अमरावती - कोरोनामुळे देशात आर्थिक मंदी आल्याने कामगारांच्या हातचे काम गेले, नोकरदारांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक व्यवसाय बंद पडले. तसेच अनेकांनी निराश होऊन आत्महत्यासारखे पाऊल उचलल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील. मात्र, लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग बंद असले तरी बळीराजाचा उद्योग बंद नव्हता, हीच बाब अजय ढोकने या उच्चशिक्षित तरुणाने हेरली आणि व्यवसाय उभा केला. सोबतच पन्नास तरुणांना कामही दिले.
मूळचा नागपूर येथील रहिवासी असलेला 27 वर्षीय अजय हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील केवळ 216 लोकसंख्या असलेल्या जामठी जामगाव येथे मामाकडे आला होता. तेवढ्यात लॉकडाऊन लागू झाले आणि तोही मामाच्या घरी अडकला. तेव्हा त्याने शेतीवर आधारित कॉर्न साइलेज चारा निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.
व्यवसाय उभारण्यासाठी कोट्यवधींचे भांडवल लागत होते. तेव्हा त्याने शक्कल लढवली आणि सर्व मशीन हैदराबाद येथून भाड्याने आणल्या. तर चारा पिकवण्यासाठी लागणारी तब्बल 250 एकर शेती ही भाडे तत्वावर(लागवणीने) घेतली. त्यामुळे परिसरात अनेक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फायदा झाला आहे. तसेच गावातील बेरोजगार तरुणांना त्याने काम दिले.
लॉकडाऊन काळात सुरु केलेला चारानिर्मितीचा व्यवसाय आता जोमात सुरू झाला आहे. काही महिन्यांतच त्याने कोट्यवधीची उलाढाल केली आहे. कॉर्न साइलेज चाऱ्याचे पीक हे 70 दिवसाचे आहे. हा चारा वर्षभर टिकत असल्याने व जनावरांसाठी पौष्टिक व पोषक आहार असल्याने यांची मागणी मोठी आहे. अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात पिकवल्या जाणारा हा चारा महाराष्ट्रासह देशातील गुजरात, छत्तीसगड, उडिसा आदी राज्यात जातो. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली म्हणून हतबल होऊन बसण्यापेक्षा आत्मनिर्भर होऊन असे व्यवसाय केल्यास कुणाला रोजगार मागण्याची गरज पडणार नाही, हे अजयच्या कामगिरीने स्पष्ट केले आहे.