अमरावती - दुष्काळामुळे पाणीटंचाईचा वणवा पेटला आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांनीही पिण्यास पाणी मिळणे कठीण झाले आहे. मात्र गावातील तरुण विकत पाणी आणून नागरिकांची तहान भागवत आहे. स्वप्निल सुरोशे असे त्या जलदाता तरुणाचे नाव आहे. त्याच्या या उपक्रमामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
दुष्काळामुळे गावागावात पाण्यासाठी वणवा पेटल्याने एक ड्रम पाण्यासाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागतात. त्याच गावात आज स्वप्निल सुरोशे हा जलदाता तरुण दरोरोज 3 हजार रुपये खर्च करून विकत पाणी आणतो. ते अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आठ हजार लोकसंखेच्या शिरखेड गावाला मोफत पाणी देऊन नागरिकांची तहान भागवतो.
अमरावती जिल्ह्याला सध्या दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. रणरणत्या उन्हात नागरिकांसह अबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मोर्शी तालुका हा ड्रायझोन परिसर असल्याने येथील पाणीबाणीचा विचारही न केलेलाच बरा. त्यामुळे 8 ते 10 दिवसाआड नळ येतो, तोही काही वेळच. मुबलक पाणी मिळत नसल्याने महिलांना सरकारी विहिरीवर पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु स्वप्नीलने सुरू केलेल्या मोफत पाणीवाटपामुळे महिलांना दिलासा मिळाला आहे.
यावर्षीच नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासून या गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीने नागरिक होरपळत आहेत. त्यातच मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने यावर्षी मात्र भीषण पाणीटंचाई निर्णाण झाली आहे. त्यामुळे येथील वृद्ध महिलाही हतबल झाल्या आहेत.
या गावात ग्रामपंचायतने चार विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तर 3 बोरवेल आहेत. मात्र भूगर्भात पाणीसाठा नसल्याने पाणी मिळत नाही. शासनाकडून अद्यापही टँकर सुरू झाला नाही. या गावातील पाणीटंचाई जेवढी नैसर्गिक आहे, त्यापेक्षा जास्त शासननिर्मित असल्याचे नागरिक सांगतात.
स्वप्निल सुरोशेने सुरु केलेल्या या उपक्रमाचा फायदा गावाला होऊ लागला आहे. दरोरोज जवळपास तीन हजार रुपये खर्च करून स्वप्निल गावला पाणीपुरवठा करतो. प्रत्येक कुटुंबाला दर 4 दिवसाआड तो एक ड्रम मोफत पाणी देतो.
दिवसातून 5 ते 6 टँकर पाणी गावात रोज वाटले जाते. मागील एक महिन्यापासून स्वप्निल हा गावात पाणीपुरवठा करत असून त्याला त्याचे मित्रही हातभार लावतात. मोठमोठे कार्यक्रम घेऊन होणारी पैशाची उधळण थांबवून जर स्वप्निल सारखा छोटासा प्रयत्न राबवला, तर नक्कीच दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्यांना दिलासा मिळेल.