अमरावती - वडिलांसोबत बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तिवसा तालुक्यातील छिंदवाडी गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीपात्रात ही घटना घडली आहे. सागर ओंकार काळे असे मृत तरुणाचे नाव आहे.
सागर हा वडिलांसोबत बकऱ्या चारायला गेला होता. त्याने बकऱ्यांचा कळप वर्धा नदीत पोहण्यासाठी सोडला. बकऱ्यांपाठोपाठ वर्धा नदीच्या पात्रात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. यावेळी त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. सागर हा या वर्षी बारावी उत्तीर्ण झाला आहे. तो नातेवाईकांकडे शिकण्यासाठी राहत होता. उन्हाळ्याच्या सुटीमुळे तो त्याच्या मूळ गावी छिंदवाडी येथे आला होता. त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.