अमरावती - मेळघाट म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो दुर्गम भाग. आदिवासीबहुल भाग, विकासाचा अभाव, खडकाळ व शेतीयोग्य नसलेली जमीन. मात्र अशाही परिस्थितीमध्ये मेळघाटमध्ये एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. शेती परवडत नाही म्हणून अनेक जण शेतीकडे पाठ फिरवतात. परंतु उत्पादनाबरोबरच विक्रीचा ताळमेळ घालता आला तर शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागत नाही. हेच दाखवून दिले आहे, धारणीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चित्री गावातील उच्चशिक्षित तरुणीने. केवळ 30 गुंठे शेतामध्ये ती दरवर्षी तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे उत्पादन घेते आहे.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावर धारणीच्या पायथ्याशी १० किलोमीटर अंतरावर चित्री हे गाव आहे. या गावात कनसे हे शेतकरी कुटुंब राहते. आई वडील दोन बहिणी व एक भाऊ अस एकूण पाच लोकांचं हे कुटुंब आहे. या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. रोडलगत एकता जगनसिंग कनसे या उच्चशिक्षित मुलीची वडिलोपार्जित केवळ दीड एकर बागायती शेती आहे. यापैकी पाऊण एकर शेतीमधून ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचे उत्पादन घेत होते. मात्र यामधून त्यांना पाहिजे त्याप्रमाणात उत्पादन मिळत नव्हते. मात्र आता त्यांनी जैवीक पद्धतीने भाजपाला लागवडीस सुरुवात केल्याने, ते वर्षाला जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक रुपयांचे उत्पादन मिळवत आहेत.
अशी झाली भाजीपाला विक्रीला सुरुवात
एकता कणसे ही उच्चशिक्षित तरुणी असून, सध्या ती आपले एमएससीचे शिक्षण पूर्ण करत आहे. पूर्वी तिचे वडील हे मोठ्या बाजारपेठेत भाजीपाला विकायला न्यायचे, मात्र एक दिवस तिच्या आईने काही भाजीपाला रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठेवला. हा भाजीपाला लगेच विकला गेला, व त्याला दर देखील चांगला मिळाला. त्यामुळे हे कुटुंब आता रोडच्या कडेलाच आपल्या भाजीपाल्याची विक्री करू लागले.
लॉकडाऊनमध्ये दररोज दहा ते बारा हजारांच्या भाजीपाल्याची विक्री
एकता कनसे सांगते की, लॉकडाऊनमध्ये भाजीपाला दुकाने देखील बंद होती. मात्र आमचे दुकान शेती लगत असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणावर यायचे लॉकडाऊनच्या या काळात दररोज दहा ते बारा हजार रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री झाली. आम्ही महिन्याकाठी साठ ते पासष्ट हजारांचा भाजीपाला विकतो, तर वर्षाकाठी चार लाखांपेक्षा अधिक भाजीपाल्याची विक्री होते. सर्व खर्च वजा जाता आम्हाला शेतीतून वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन मिळत आहे.
शासनाच्या विकेल ते पिकेल योजनेचा लाभ
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेचा फायदा देखील या तरुणीला होत आहे. भाजीपाल्याची विक्री करताना शेतकरी ते ग्राहक असा थेट संबंध येतो. त्यामुळे मध्यस्थांना जाणारे कमिशन द्यावे लागत नाही, यातून पैशांची बचत होते. वाहतुकीच्या खर्चात देखील बचत होत असल्याने दुहेरी नफा होत असल्याची माहिती एकता कनसे यांनी सांगितले.
सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन
कनसे कुटुंबीय हे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला तसेच ताजा भाजीपाला मिळत असल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहक इथे नेहमीच गर्दी करत असतात. त्यामुळे परतवाडा ते धारणी बराणपुर आणि मध्यप्रदेशमध्ये जाणारे लोक देखील येथे थांबून भाजीपाला खरेदी करतात. ज्या ग्राहकांना भाजीपाला दूरवर न्यायचा असेल त्यांना कनसे कुटुंब शेतातून ताजा भाजीपाला काढून देते.
मंंत्री यशोमती ठाकूर यांची भाजीपाला दुकानाला भेट
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर या मेळघाट दौऱ्यावर असताना, त्यांनी चित्री गावातील एकता कणसे या तरुणीच्या भाजीपाला दुकानाला भेट दिली. तसेच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवून तिच्याकडून भाजीपाला देखील खरेदी केला.
संपूर्ण कुटुंबच करते शेतीची कामे
एकता आणि तिचे संपूर्ण कुटुंब शेतीची कामे करतात. त्यामुळे मजुरांना लागणाऱ्या खर्चामध्ये देखील बचत होते. एकता कनसे ही तरुणी शिक्षानासोबतच शेतीमध्ये काम करून आपल्या आई-वडिलांना मदत करत आहे. एकताकडे एकूण साठ गुंठे अर्थात दीड एकर शेती आहे. त्यापैकी तीस गुंठे शेतातमध्ये ती भाजीपाला पिकवते, तर उर्वरीत तीस गुंठ्यामध्ये तीने यावर्षी मक्याचे पीक घेतले आहे. तिला 30 गुंठ्यांमध्ये तब्बल 18 क्विंटल मकाचे उत्पादन झाले आहे.
हेही वाचा -चितळे बंधू मिठाईवालेकडे खंडणी मागणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना अटक