अमरावती - 'राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या कुटुंबातील महिलांच्या बचतगटाद्वारे मशरुम शेती, मधुमक्षिका पालनातून मधनिर्मिती, कमळाची शेती आदी स्वयंरोजगार निर्माण होणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. विविध उत्पादने निर्माण केली जात आहेत. हा उपक्रम वाखाणण्यासारखा आहे. या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 'उडान' व महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यासपीठ मिळवून दिले जाईल', अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (4 जून) दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ येथे महिला बचत गटाद्वारे उत्पादीत वस्तूंच्या प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.
'एसआरपीएफने प्रस्ताव सादर करावा'
'एसआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी, जनतेच्या सुरक्षेकरिता अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहून देशसेवा करत असतात. त्यांच्या कुटुंबातील महिलांना सुरक्षित वातावरणात स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने एसआरपीएफ गटाद्वारे महिलांचे बचतगट तयार करण्यात आले आहेत. बचतगटाच्या माध्यमातून विविध मशरुम, नैसर्गिक मध, कमळाची फुले आदी उत्पादने निर्माण केली जात आहेत. या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून त्यांचा उडान व महिला आर्थिक विकास महामंडळ उपक्रमात समावेश करू. यासाठी 'एसआरपीएफ'ने प्रस्ताव सादर करावा. आवश्यक मान्यता व गरज पडल्यास निधीची तरतूद करू', असे यावेळी यशोमती ठाकूर यांनी म्हटले.
गटात खेळीमेळीचे वातावरण
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9चे पोद्दार म्हणाले, की 'राज्यात किंवा जिल्ह्यात कुठेही संकट उभे राहिले, तर आपत्ती निवारणासाठी राज्य राखीव दलाला त्याठिकाणी पाचारण केले जाऊन बंदोबस्त केला जातो. देशसेवा किंवा कर्तव्य बजावत असताना अनेक दिवस, महिने जवानांना त्याच ठिकाणी कुटुंबापासून दूर रहावे लागते. अशा काळात त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित वाटावे, त्यांना घरगुती वातावरण मिळावे, यासाठी बचत गटाद्वारे विविध उपक्रम राबवले जातात. महिला बचतगटांची स्थापना करून सदस्यांना शास्त्रोक्त पद्धतीचे प्रशिक्षणसुध्दा देण्यात आले आहे. सुमारे 40 महिला बचत गटांची निर्मिती करून त्यांना यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी गटाद्वारे मदत करण्यात येते. ई-कॉमर्सच्या माध्यमातून उत्पादनांची विक्री केली जात आहे. या माध्यमातून बचतगटांना आर्थिक स्थैर मिळवून दिले जात आहे. खेळीमेळीच्या अगदी कौटुंबिक वातावरणात उत्पादनांची निर्मिती होत असल्यामुळे सर्वजण आनंदी आहेत'.
पालकमंत्र्यांना मानवंदना
दरम्यान, पालकमंत्र्यांनी प्रदर्शनात ठेवलेल्या उत्पादनांची माहिती व उपयुक्तता जाणून घेतली. प्रारंभी पालकमंत्र्यांना एसआरपीएफ गटाद्वारे मानवंदना देण्यात आली.
हेही वाचा - ठाण्यात म्यूकरमायकोसिसच्या 11 रुग्णांवर यशस्वी उपचार