अमरावती - कोरोनामुळे राज्यातील अनेक लहान बालकांच्या आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या लहान बालकांना अर्थसहाय्य देण्याची मागणी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कोरोनामुळे राज्यातील अनेक लहान बालकांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. त्यामुळे त्यांचा आधार निघून गेला आहे. तर अनेक लहान बालकांपैकी कुणाची आई तर कुणाचे वडील कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहे.
मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक -
कोविड काळात दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावे ५ लाख रुपये मुदत ठेव ठेवून त्यावर येणारे व्याज त्यांना मिळत रहावे. एक पालक गमावलेल्या बालकांना ‘बाल संगोपन’ योजनेत समाविष्ट करत दरमहा २५०० रुपये मदत मंजूर करावी, अशी मागणी यावेळी केली. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक असून लवकरच कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी माहितीही मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.