अमरावती - कोरोनामुळे परिस्थिती गंभीर आहे. आपल्याकडे ऑक्सिजन आणि औषधांचा साठा अपुरा आहे. आपण कठीण परिस्थितीला सामोरे जात आहोत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. सर्वांनी परिस्थिचे गांभीर्य ओळखायला हवे, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून 'स्टीम' सप्ताह -
आपण कोरोनाबाबत गंभीर राहिलो नाही, त्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. पुन्हा एकदा सर्वांना स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रत्येकाने स्टीम अर्थात वाफ घ्यायला हवी. वाफेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात सोमवारपासून स्टीम सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. या स्टीम सप्ताहाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकिला खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार रवी राणा, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हाधिकरी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बाळाजी एन, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे उपस्थित होते.
ऑक्सिजन निर्मितीचे नियोजन
ऑक्सिजन निर्मितीच्या नियोजनावर बैठकीत चर्चा झाली. ऑक्सिजन निर्मितीसाठी काही मंडळींशी बोलणे सुरू आहे. मात्र, ऑक्सिजन निर्मितीला 30 दिवस लागणार, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.
अमरावतीचे ऑक्सिजन गेले यवतमाळला -
अमरावती आणि अकोल्यासाठी गुरुवारी मुंबईवरून 15 टन ऑक्सिजन आले होते. अकोल्याला टँकरमधून 7.5 टन ऑक्सिजन काढून उर्वरित 7.5 टन ऑक्सिजन अमरावतीला न येता यवतमाळला नेण्यात आले. याबाबत बोलताना यशोमती ठाकूर म्हणल्या हा विषय वादाचा नाही. यवतमाळमध्येही आपल्या बांधवांसाठीच ऑक्सिजन गेले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी लेखी तक्रार द्यावी -
अमरावतीत औषधांचा किंवा ऑक्सिजनचा काळाबाजर होत असेल तर याबाबत खासदार नवनीत राणा यांनी केवळ आरोप न करता लेखी तक्रार द्यावी. आम्ही नक्की कारवाई करू, असे यशोमती ठाकूर म्हणल्या. सध्याच्या परिस्थिती त्यांनी सहकार्याची भावना ठेवायला हवी, असेही त्याम्हणाल्या.
केंद्र सरकारने सहकार्य केल्यास परिस्थिती सुधारेल -
कोरोना उपचारासाठी हव्या असणाऱ्या सर्व सुविधा केंद्र सरकारने केंद्रीकृत केल्या आहेत. केंद्र सरकारने आम्हाला सहकार्य केले तर ही गंभीर परिस्थिती सुधारू शकेल. मात्र, तसे होत नाही. खासदार नवनीत राणा केंद्रात आहेत. त्यांनी तिथून मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे यशोमती ठाकूर म्हणल्या.