अमरावती - श्री साई बहुद्देशीय संस्था आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने दसरा मैदान येथे राज्यस्तरीय कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याहस्ते या स्पधेचे उद्घाटन करण्यात आले.
अमरावतीचा गोविंद कपाटे आणि वाशिमचा लक्ष्मण इंगोले यांच्यात रंगलेल्या उद्घाटकीय लढतीत गोविंद कपाटे याने बाजी मारली. दसरा मैदान येथे लाल मातीचा भव्य हौदात राज्यभरातून आलेले कुस्तीपटू प्रतिस्पर्ध्याना लढत देत आहे. प्रवीण पोटे यांनी मैदानावर हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करीत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार डॉ. सुनील देशमुख, उपमहापौर संध्या टिकले, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत देहणकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेचे स्थाई समिती सभापती विवेक कालिती प्रामुख्याने उपस्थित होते.
पहिल्या स्पर्धेतील विजेते गोविंद कपाटे आणि उपविजेते लक्ष्मण इंगोले यांना पदक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, वाशिम, पुसद, अंजनगाव, कारंजायेथील सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी झाले आहेत.
विविध गटात ५ लाख रुपयांची बक्षिसे वितरीत केली जाणार आहे. अंतिम सामन्यात विजयी होणाऱ्या कुस्तीपटूला २ लाख रुपये रोख बक्षीस दिले जाणार असून द्वितीय स्थानावर मजल मारणाऱ्या कुस्तीपटूला १ लाख रुपये रोख बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेत अहमदनगर येथील योगेश पवार आणि पुणे येथील साईनाथ रानडे यांच्यातही दंगल रंगणार आहे.