अमरावती - श्रावण महिना येताच सण-उत्सवांना प्रारंभ होतो. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येणाऱ्या सावरखेड गावात श्रावण महिन्यात ग्रामदेवतेच्या पूजेचा उत्सव साजरा होतो. या उत्सवानिमित्त गावातील प्रत्येक घरी पाहुणे येतात. या गावात श्रावणातील ग्रामदेवतेच्या पूजेची परंपरा शेकडो वर्षांपासून जोपासली जात आहे.
गावाच्या वेशीवर ग्रामदेवतेचे तीन मंदिर -
बेंबळा नदीच्या काठावर वसलेल्या सावरखेड गावाच्या वेशीवर मरिमाय, मतमाय आणि खोकला देवी या तीन ग्रामदेवतेचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात दर मंगळवारी आणि शनिवारी या देवीची उपासना केली जाते. श्रावण महिम्याच्या अखेरच्या आठवड्यात येणाऱ्या मंगळवारी ग्रामदेवतेच्या पूजेचा मोठा कार्यक्रम असतो. या दिवशी गावातील पोलीस पाटलांच्या कुळातील प्रमुख महिलेला पूजेचा पहिला मान असतो. घरून वाजंत्रीच्या नादात पोलीस पाटलांच्या कुटुंबातील महिला सकाळी 11 वाजता मंदिरात येतात. त्यांची पूजा आटोपल्याबर गावतील इतर मंडळी ग्रामदेवतेची पूजा करता. यावेळी छोट्या आकारातील पोळ्या, भाजीचा नैवेद्य तिन्ही देऊन अर्पण केला जातो. ग्रामदेवतेच्या पूजेसोबतच गावातून वाहणाऱ्या बेंबळा नदीचीही पूजा केली जाते.
रोडग्याच्या जेवणाला महत्त्व -
ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त रोडग्याच्या जेवणाला महत्त्व दिले जाते. श्रावणसरी बरसात असताना अनेक दिवसांपूर्वीच तयार केलेल्या शेणाच्या गौऱ्या या गायीच्या गोठ्यात किंव्हा घराचा आवारात रोडगे तयार केले जातात. रोडग्यांसोबत काशिफळाची भाजी केली जाते. या प्रसादात अंबाडीची भाजीलाही महत्त्व असून अंबाडीची भाजीही केली जाते. जवळपास प्रत्येक घरात हा महाप्रसाद असतो. महाप्रसादासाठी प्रत्येक घरी बाहेर गावावरून नातेवाईक, मित्रमंडळी येत असल्याने गाव अगदी गजबजून जाते.
देवीकडे गावाला सुखात ठेवण्याचे साकडे -
गावाच्या वेशीवर असणाऱ्या ग्रामदेवता गावावर येणारे सर्व संकट टाळतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळेच दरवर्षी श्रावणात हा उत्सव साजरा केला जातो. काही अडचणींमुळे श्रावणातल्या अखेरच्या मंगळवारी या ग्रामदेवतेच्या पूजेत अडचण आली, तर पोळ्याच्या दिवशी सुद्धा अनेकदा हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाद्वारे गावाला सुखात ठेवण्याचे साकडे ग्रामस्थ ग्रामदेवतेला घालतात. ग्रामदेवता गावावर येणाऱ्या पीडा टाळतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख यांचे जावई आणि वकील सीबीआयच्या ताब्यात, नोंदवले जबाब