अमरावती - जगभरामध्ये जागतिक पोस्टल डे अर्थात टपाल दिन 9 ऑक्टोबरला साजरा होत असतो. जेव्हा संवादाचे कुठलेच साधन उपलब्ध होत नव्हते तेव्हा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या व्यक्तीशी संवाद हा टपाल शाखेच्या पत्रव्यवहार मधून होत होता. हल्ली प्रत्येकांच्या हातावर मोबाईल आले असले तरी टपालाचे महत्व मात्र आजही कायम आहे. 1974 साली टपाल युनिवर्सल पोस्टल युनियनची स्थापना झाली होती. त्यानंतर 1969 पासून हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो.
जिथे मोबाईल नेटवर्क नाही तिथे पोस्टमन -
इंटरनेटच्या काळात आजही लोक टपाल सेवेचा वापर करत असतात. पत्रव्यवहाराच्या देवाणघेवाणीच विश्वसनीय साधन म्हणून आजही लोक टपाल सेवेकडे पाहत असतात. देशातच नाही तर जगात कुठल्याही देशात टपाल पाठवण्यासाठी या सेवेचा लाभ घेतला जातो. टपाल दिवसाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम टपाल दिनाला होत असते. आजही देशाच्या ग्रामीण भागात ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही तिथे मात्र पोस्टमन आपल्या सायकलवरून किंवा वाहनावरून आलेला संदेश लिफाम्यामध्ये घेऊन जातात.
अमरावतीच्या मेळघाटात सर्वाधिक पोस्टाची सेवा -
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग अतिदुर्गम आहे. आदिवासी बहुल भाग म्हणून या भागाची ओळख आहे.सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटात स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही अनेक विद्युत पोहोचली नाही तर अनेक गावात आजही नेटवर्क नाही. परंतु, त्या गावात मात्र पोस्टमन नियमित पोहचतो. रस्ते दळणवळणाचे साधन नाही परंतु अशाही परिस्थितीत इथे पोस्टमन सेवा देत असल्याचा टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चिखलदरा-धारणी या दोन तालुक्यात सेवा -
मेळघाटमध्ये धारणी आणि चिखलदरा हे दोन तालुके आहे. या दोन तालुक्यांमध्ये जवळ पाच ठिकाणी पोस्ट ऑफिस आहे. या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून गावोगावी पत्रव्यवहार पोहोचण्याच काम केले जाते. आता प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. त्यामुळे संवाद सुकर झाला असला तरी मेळघाटमधील आदिवासी बांधव आजही पत्रव्यवहार करून आपल्या नातेवाईकांसोबत संवाद साधत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोस्टमनवर आहे आदिवासी बांधवांचा दृढ विश्वास -
मेळघाटातील आदिवासी बांधवांचा पोस्ट खात्यावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या माध्यमातून मिळालेल्या कामाचे पैसे ही पोस्टमन घरपोच आणून देत असल्याने पोस्टमनवर येथील आदिवासी बांधवांचा मोठा विश्वास आहे. वाहन नसल्यामुळे बँकांमध्ये जाण्यासाठी अडचण निर्माण होते. परंतु, पोस्टमन असल्यामुळे मात्र आदिवासी बांधवांचे पैसे मोबाईल अप्सच्या माध्यमातून घरपोच येतात.
बहीण-भावाचे नाते मजबूत करणारे टपाल खाते -
दरवर्षी रक्षाबंधनाला प्रत्येक बहीण-भाऊ एकमेकांच्या घरी जाऊ शकत नाही. अशा वेळेस मात्र टपाल खात्याच्या माध्यमातून लाखो बहिणींच्या राख्या या आपल्या भावापर्यंत रक्षाबंधनाला पोहोचविण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षांपासून टपाल खाते अविरतपणे करत आहे. कोरोना काळातही पुन्हा एकदा टपाल खात्याचे महत्व अधोरेखित झाले आहे.
टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू -
आपल्या देशात सण उत्सव जसे साजरे होतात. तसेच प्रत्येक दिवस साजरा होतो. तो दिवस साजरा करण्याचे काही ना काही कारण असते. जगात दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच की, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करणे होय. जागतिक टपाल दिनाचा इतिहास यूनिवर्सल पोस्टल यूनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी 1874 मध्ये स्विर्झलंडची राजधानी 'बर्न' येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. टोकियोत 1969 मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. 1 जुलै 1876 ला भारत 'यूनिवर्सल पोस्टल यूनियन' चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला.
भारतीय टपालाचे जगातील सर्वात मोठे जाळे -
भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रही येथे मिळते.
हेही वाचा - जागतिक टपाल दिन : नाविन्यपूर्ण टपाल तिकीट संग्रहाचा बादशहा 'रविंद्र ओबेरॉय'