अमरावती- वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथून धामणगाव रेल्वे पर्यंत भर उणात १५० किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या ११ आदिवासी तरुण मजुरांना गावी पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी वाहतूक व्यवस्था करून दिली. हे ११ मजूर पोटाची खळगी भरण्यासाठी मेळघाटातून वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे गेले होते. मात्र, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने मजुरांना पायीच आपल्या घराकडची वाट धरावी लागली होती.
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मदतीमुळे आदिवासी मजुरांचा पुढील २०० किलोमीटरचा पायदळ प्रवास टळला आहे. मेळघाटात रोजगाराची वानवा असल्याने दरवर्षी हजारो आदिवासी कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरीत होत असतात. सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे, देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे, सर्व कामे ठप्प झाल्याने सर्व मजूर आपल्या गावी जात आहे.
सदर ११ तरुणांनी सुद्धा आपल्या गावी जायचा निर्णय घेतला. परंतु, कोणतेही वाहन नसल्याने ते आज सकाळी वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथून गावाकडे जायला निघाले. रखरखत्या उन्हात पोटात अन्नाचा कण नाही, अशा परिस्थितीत या तरुणांनी कसे बसे १५० किलोमीटर अंतर पार केले. त्यानंतर धामणगाव रेल्वे येथे पोहोचल्यानंतर तहसीलदारांच्या मदतीने सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांची जेवणाची व्यवस्था केली. स्थानिकांनी ही बाब जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरांसाठी मेळघाटात जाण्याची व्यवस्था केली.
हेही वाचा- COVID19 : अमरावतीकरांना अत्यावश्यक सुविधा मिळणार घरपोच...