अमरावती - राज्याचे कामगार राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने कामगारांच्या हितासाठी आवाज उठवतात. परंतु त्यांच्याच खात्याअंतर्गत येणाऱ्या कामगार कल्याण मंडळ कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे मात्र अमरावती जिल्ह्यातील हजारो गोरगरीब कामगारांना फटका बसत आहे. दिवसभर रांगेत लागून सुद्धा कामगार नोंदणी होत नसल्याने आता जिल्ह्यातील शेकडो कामगार आपल्या मुलांना घेऊन कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयासमोर मंगळवारपासून (दि.22 जून) ठाण मांडून बसले आहेत. विशेष म्हणजे, कामगार राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडूंच्याच जिल्ह्यात हा गंभीर प्रकार सुरू आहे. एकीकडे शेतीचे कामे करावी की कामगार नोंदणी? असा सवाल आता कामगार विचारत आहे.
कालपासून कार्यालयाबाहेर बसले आहेत कामगार
मागील अनेक महिन्यांपासून अमरावतीमध्ये कामगारांची नोंदणी सुरु आहे परंतु मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कामगार नोंदणी बंद होती. परंतु मागील आठ ते दहा दिवसांपासून कामगार नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कामगार दररोज कामगार नोंदणीसाठी येतात. जिल्ह्यात एकूण 14 तालुके असून त्यापैकी कामगार नोंदणी कार्यालय फक्त अमरावतीमध्ये आहे. त्यामुळे 14 तालुक्यातील सर्व कामगार हे अमरावतीमध्ये नोंदणीसाठी येतात. कामगार कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे मात्र या कामगारांची नोंदणी होत नाही. तास न् तास रांगेत उभ राहून सुद्धा नंबर लागत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी तरी सकाळी नंबर लागेल या आशेने शेकडो कामगार हे शिदोरी घेऊन कार्यालयाबाहेर रात्रभर मुक्काम करत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. हल्ली पावसाळ्याचे दिवस असून केव्हाही पाऊस येतो. त्यामुळे अशा वातावरणात सुद्धा महिलासुद्धा लहान मुलांना घेऊन येथे मुक्काम करण्याची नामुष्की ओढावली आहे.
कार्यालय परिसरात एजंटांचा सुळसुळाट
या कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालय परिसरात एजंटांचा सुळसुळाट असून या एजंटांमार्फत पैसे देऊन कामगारांची नोंदणी केली जात असल्याचा आरोपसुद्धा येथे आलेल्या कामगारांनी केला आहे. त्यामुळे याच्यांवर कधी कारवाई होणार? असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यातील 14 ही तालुक्यात कामगार नोंदणी केंद्र उभारण्याची कामगारांची मागणी
जिल्ह्यात सध्या शेताची कामे सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक कामगार अमरावतीला येऊ शकत नाही. मात्र नोंदणीसाठी शेतीचे व इतर कामे त्यांना बंद ठेवून त्यांना अमरावतीच्या कार्यालयात दिवसभर थांबावे लागते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी कामगार नोंदणी कार्यालय सुरू करावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
कोरोनाचे नियम पायदळी
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसरी लाट आता उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कोरोना नियम पाळणे गरजेचे असताना या कार्यालयात मात्र दररोज हजारो कामगारांची गर्दी होते. यावेळी मात्र सोशल डिस्टंन्स पाळले जात नाही. अनेकजण मास्कही लावत नाही. त्यामुळे कोरोनाच्या लाटेला आपणच तर आंमत्रण देत नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हेही वाचा - प्रत्येक जिल्ह्यातून डेल्टा प्लसचे नमुने गोळा केले जाणार - राजेश टोपे