अमरावती : शहरातील रवी नगर स्थित हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या पर्वावर रविवारी सायंकाळी खास महिलांसाठी सामूहिक हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले होते. परिसरातील महिलांसह शहराच्या विविध भागातील महिला हनुमान चालीसा पठण सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. खासदार नवनीत राणा यादेखील या विशेष सोहळ्याला उपस्थित होत्या.
अनेक वर्षांची परंपरा : रवी नगर परिसरातील हनुमान मंदिरात गत अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा होतो. या मंदिराच्या वतीने हनुमान जयंतीच्या पर्वावर खास महिलांसाठी हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात येते. सुमारे 25 ते 30 वर्षांपासून महिलांच्या सामूहिक हनुमान चालीसा पठणाची परंपरा या ठिकाणी कायम आहे. हनुमान जयंतीच्या पर्वावर पहाटे अभिषेक करून हनुमानाची पूजा आणि आरती केली जाते. हनुमान जयंतीला सकाळी 11:00 वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
हनुमान चालीसा पठण : गतवर्षी याच ठिकाणी खासदार नवनीत राणा आल्या होत्या चर्चेत. खासदार नवनीत राणा या सोहळ्याला दरवर्षी भेट देतात. गतवर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर, आम्ही हनुमान चालीसा पठण करणार असा इशारा दिला होता. दरम्यान खासदार नवनीत राणा रवी नगर येथील मंदिरात आयोजित महिलांच्या सामूहिक हनुमान चालीसा पठणात सहभागी होऊन या ठिकाणी 11 वेळा त्यांनी महिलांसह हनुमान चालीसा पठण केले होते.
बारा दिवस कारावास : त्यावेळी त्यांच्या हनुमान चालीसा पठणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आणि हनुमान चालीसामुळे देशभर प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. खासदार नवनीत राणा यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणार अशी भूमिका घेतल्यावर मुंबईसह अमरावती प्रचंड खळबळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत जाऊन पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा, बडनेराचे आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक करून त्यांना बारा दिवस कारागृहात ठेवण्यात आले होते.
हेही वाचा - Savarkar Gaurav Yatra : सावरकर गौरव यात्रेला सुरुवात, यात्रा पूर्वनियोजित - अतुल सावे