अमरावती - महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमेवर विदर्भातील सर्वात दीर्घकाळ चालणारी यात्रा म्हणजे बहीरम बाबांची यात्रा. विशेष हंडीतील मटणासाठी प्रसिद्ध असलेली ही यात्रा आता खास बैतूलमधून आलेल्या मातीच्या भांड्यांसाठी ओळखू लागली आहे. या यात्रेत सातपुडा पर्वत रांगांच्या मातीतून बनवलेल्या, नक्षीकाम केलेल्या मातीच्या वस्तू घेण्याकडे महिलांचा कल दिसून येतो. या वस्तूंचा वापर महिला मकर संक्रांतीच्या वाणात देण्यासाठी करतात.
नक्षीकाम केलेल्या वस्तूमध्ये फ्लॉवर पॉट, पैसे साठवण्याची वस्तू (भीशी), नक्षीदार धुपारने, कप-बशी, अगरबत्ती घर व आकर्षक अशा छोट्या भांड्यांना संक्रांतीच्या वाणात जागा मिळाली आहे. या माध्यमातून प्रदूषण टाळता येईल व आरोग्यासाठी योग्य राहील, असे मत महिलांनी व्यक्त केले.
हेही वाचा - जखमी सापावर यशस्वी शस्त्रक्रिया; ड्रिल मशीनने झाला होता जखमी
मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील झल्लार गावात एक-दोन कुटुंब ही भांडी तयार करतात. पर्वतातील मातीपासून ही भांडी तयार होतात. यात्रेत विकण्यासाठी मातीची भांडी दोन ते तीन महिने अगोदर तयार करायला सुरुवात होते. हा पिढीजात व्यवसाय असून ही नक्षीदार भांडी आपणही महिलांना संक्रातीच्या वानात द्यावी, असे महिला म्हणतात.
मकर संक्रांतीच्या सणानिमित्त तुम्हीही मातीच्या वस्तू वाणात द्यायचा विचार करत असाल तर तो अतिशय योग्य असून याच्या माध्यमातून अनेक हातांना रोजगारही मिळेल आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल.
हेही वाचा - प्रजासत्ताक दिनी स्टंट करणाऱ्यांवर होणार कारवाई, अमरावती पोलीस आयुक्तांच्या सूचना