अमरावती - राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी येथील जिल्हा न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या कारचालकासह सोबतचे दोन कार्यकर्तेदेखील दोषी ठरले आहेत. मंत्र्यांनाच शिक्षा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तत्कालीन काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर येथील गद्रे चौक ते चुनाभट्टी या एकेरी मार्गावरून २५ मार्च २०१२ ला आपल्या टाटा सफारी वाहनातून जात असताना वाहतूक पोलीस शिपाई उल्हास रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले होते. यावेळी यशोमती ठाकूर आणि वाहनातील कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार रौराळे यांनी राजापेठ पोलिसात केली होती. यानंतर यशोमती ठाकूर यांच्यासह शरद जवंजाळ आणि राजू इंगळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. नंतर रात्री उशिरा यशोमती ठाकूर यांनी वाहतूक पोलिसाने हक्कभंग केल्याची आणि ५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात आणि पोलीस आयुक्तांकडे नोंदवली होती.
काय आहे प्रकरण
यशोमती ठाकूर या एकविरा मंगल कार्यालयात विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या. परतीच्या प्रवासात गांधी चौकाकडे जाताना एकेरी मार्गावर रौराळे यांनी त्यांचे वाहन अडवले होते. चालकाला वाहन परत नेण्यास सांगूनही त्याने इशारा न जुमानता आपल्या दिशेने आणले. आमदारांच्या इशाऱ्यावरून चालकाने वाहन पुढे नेण्याचा प्रयत्ना केला. आपण वाहन अडवण्याचा प्रयत्ना केला, तेव्हा आमदार यशोमती ठाकूर या गाडीतून खाली उतरल्या आणि आपल्याला थप्पड लगावले तसेच त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे रौराळे यांनी तक्रारीत नमूद केले होते.
हा मार्ग एकेरी असल्याची माहिती चालकाला नव्हती, त्या ठिकाणी एकदिशा मार्गाचा कोणताही फलक नव्हता. आपण वाहतूक पोलीस शिपायांना स्वत:ची ओळखही दिली. परंतू शिपायाने आपल्यासोबत वाद घातला, त्यानंतर वाहनचालक सागर खांडेकर याला ५ हजार रुपये दिल्यास गाडी लगेच सोडली जाईल, अन्यथा नाही, असे म्हटले. संबंधित कर्मचाऱ्याचे वर्तन हे बेजबाबदारपणाचे आणि असभ्य होते, असे यशोमती ठाकूर यांनी तक्रारीत म्हटले होते.
हेही वाचा - अमरावतीत 102 बेघरांसाठी सुसज्ज निवारा; आणखी काही जणांची करावी लागणार व्यवस्था